अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
बाभूळगाव तालुक्यातील विरखेड फाट्यावरील घटना
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा: बाभूळगाव /यवतमाळ:-
बाभूळगाव तालुक्यातील विरखेड फाट्यावजवळ आज दि. २९ रोजी सायंकाळी ४.३० वाजताचे सुमारास एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास उडवल्याची घटना घडली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर त्याच वेळी संबंधीत वाहनाने दुस-या एका दुचाकीला त्याच ठिकाणी उडवले. हा विचित्र अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन तेथून पसार झाले. संबंधीत वाहन हे आयशर कंपनीचे असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार प्रविण मारोतराव बोरकर, वय ४५, रा. नायगाव हे गवंडी फाट्यावरून बाभूळगावकडे येत होते. त्याच वेळी यवतमाळहून धामणगावकडे जाणा-या आयशरने प्रविण बोरकर यांच्या अॅक्टीव्हा क्र. एम.एच.२९बी.के.६४०१ या गाडीला कट मारला. त्यामुळे ते खाली पडले. त्याच वेळी मागुन धामणगावहून बाभूळगाव कडे येत असलेल्या बजाज पल्सर क्र.एम.एम.२९.बी.वाय.४८६५ या वाहनाला सुद्धा त्याच आयशरने जबर धडक दिली. त्यात पल्सर चालक अल्ताफ शहा कलंदर शहा, वय ४५, रा. दिग्रस, हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच बाभूळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संधीचा फायदा घेवून आयशर वाहन घटनास्थळावरून पसार झाले. पोलीसांनी जखमी प्रविण बोरकर यास यवतमाळ येथे रेफर केले. तर मृतक अल्ताफ शहा यास ग्रामीण रूग्णालय येथे पाठविले. सदर आयशर वाहनाचा शोध बाभूळगाव पोलीस घेत आहेत.