
वाढीव मालमत्ता कराच्या नोटिसीवर ३० ऑगस्टपर्यंत आक्षेप घ्यावा
अन्यथा कर मान्य आहे असे समजले जाणार ?
प्रतिनिधी | बाभुळगाव
स्थानिक नगर पंचायतद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण व मूल्यांकन करण्यात आले. त्यामुळे शहरातील जुन्या, नव्या मालमत्तांवर न.प.च्या कर विभागाद्वारे वाढीव मालमत्ता कर लावण्यात आला. २० जुलैपासून आजवर दोन हजाराहून अधिक मालमत्ता धारकांना नोटीस देण्यात आली असून, त्यांना नगर पंचायतद्वारे आकारण्यात आलेला कर योग्य वाटत नसेल किंवा मालमत्तांच्या नोंदीत काही चुका असतील तर त्यावर ३० ऑगस्टपर्यंत आक्षेप दाखल करायचा आहे. जे मालमत्ताधारक या तारखेपूर्वी हरकती आक्षेप दाखल करणार नाहीत, त्यांना आकारण्यात आलेला मालमत्ता कर मान्य असल्याचे गृहीत धरले जाईल, असे नगर पंचायतद्वारे स्पष्ट केले आहे.
नगर पंचायतद्वारे यावर्षी नव्याने कर निर्धारण करण्यात आले असून ते लागू करण्याकरिता मालमत्ताधारकांना नोटीसद्वारे कळविण्यात आले होते.पहिल्या टप्प्यातील नोटीस जुलै महिन्यात वाटण्यात आल्या होत्या.त्यावर ८ ऑगस्ट पूर्वी आक्षेप नोंदविणे अनिवार्य होते.दुसऱ्या टप्प्यातील नोटीस १५ ऑगस्टपर्यंत ज्यांना मिळाल्या त्यांना ३० ऑगस्टच्या आधी आक्षेप व हरकती दाखल कराव्या लागतील. त्यानंतर त्यांना कोणतीही संधी मिळणार नाही. पहिल्या टप्प्यातील नोटीसविरोधात आजवर सुमारे ६०० जणांनी आक्षेप दाखल केले असून त्यापैकी सर्वच मालमत्ता धारकांच्या सुनावण्या नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत.शहरात २ हजारावर मालमत्ता असल्यामुळे एकाचवेळी एवढ्या नोटीस बजावणे शक्य नसल्याने टप्याटप्याने नोटीस दिल्या गेल्या.
संघर्ष समिती उभी ठाकली नागरिकांच्या मदतीला
नगर पंचायतच्या वाढीव कर मुल्यांकनविरोधात बाभूळगाव संघर्ष समिती नागरिकांच्या मदतीला उभी ठाकली आहे. शहरातील नागरिकांच्या उत्पन्नात कुठल्याही प्रकारची वाढ नगर पंचायतने केली नाही. शिक्षण, रोजगार हमी सारख्या सोई-सुविधा नगर पंचायतने आज पर्यंत नागरिकांना दिल्या नाहीत त्याचाहि नव्या करवाढीमध्ये समावेश केला आहे. अव्वाच्यासव्वा कर वाढ नागरिकांवर लादण्याचा डाव आखला आहे. अश्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधीनी जनतेच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून सभागृहात कर वाढीला विरोध करणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या विश्वासाला तडा दिल्याची चर्चा शहरात होत आहे. या विरोधात संघर्ष समितीने तंत्रशुद्ध, कायदेशीर आक्षेप तयार करून घेतला असून त्या नमुन्यामध्ये जनतेने आक्षेप अर्ज नगर पंचायतला सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



