
अमोलकचंद महाविद्यालयात पदवी वितरण समारंभाचे थाटात आयोजन
कला, विज्ञान,वाणिज्य शाखांमधील ३९७ विद्यार्थ्यांना पदवी वितरीत
यवतमाळ | दुशंत शेळके:-
अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ येथून शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमधून पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि पदवी प्राप्तीचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सी. ए. प्रकाश चोपडा, सचिव, विद्या प्रसारक मंडळ, यवतमाळ व प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री, शेंद्रिय शेतीतज्ञ सुभाष शर्मा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी.भांडवलकर, अंतर्गत गुणवत्ता हमी समितीचे समन्वयक डॉ. पी. पी. जोशी हे उपस्थित होते .
प्राचार्य डॉ. आर. बी. भांडवलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाशी निगडित पदवी ग्रहणाची शपथ दिली. पद्मश्री सुभाष शर्मा यांनी शेंद्रिय शेती, तांत्रिक शेती, भविष्यातील शेतीचे महत्त्व आणि देशाच्या विकासात माती, पाणी व पर्यावरणाचे संरक्षण करून शेतीचे योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत घ्यावी, कोणतेही पूर्वग्रह बाळगू नयेत, परिस्थितीमधून मार्ग काढत स्वतःचे आयुष्य घडवावे आणि उत्तम व्यक्तिमत्त्व विकसित करावे, असा कानमंत्र सी.ए. प्रकाश चोपडा यांनी अध्यक्षीय भाषणातून दिला. या समारंभात कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांमधील एकूण ३९७ पदवी व पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या समारंभाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. सी. जाधव, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. प्रशांत मुस्कावार, डॉ. सुनीता गुप्ता, प्रशांत गावंडे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनघा अनमोद यांनी केले, तर प्रा. शशिकांत राठोड यांनी आभार मानले. तांत्रिक सहाय्य प्रा. डॉ. ओमकार कापसे, अनिल गोठे, शरद आडे आणि शरद लिहितकर यांनी प्रदान केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.