आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी राळेगाव मतदार संघाचा विकास केला नाही!
—– पत्र परिषदेत अशोक मेश्राम यांचा आरोप
दिव्यदृष्टी डिजिटल वूत्तासेवा | बाभूळगाव :-
राळेगाव मतदार संघातून काँग्रेसची तिकीट अशोक मारोती मेश्राम मागत आहेत. काँग्रेसची विचारधारा ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी असल्याने तिकीट मागत आहे. असे ते म्हणतात. अशोक मेश्राम यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत १५ हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, पोलिस गाईड पुस्तके दिली, शेतकऱ्यांना पावसात काम करतेवेळी अडचण येऊ नये यासाठी रेन कोट, छत्री वाटप केले, माजी सैनिकांचा सत्कार, पायी वारी करणारे वारकरीचा सत्कार केला, आदिवासींना जमिनीचे पट्टे देण्यासाठी काम केले आहे. त्यांनी पुढे सांगितले कि, कॉंग्रेसने एकच एक उमेदवार पुन्हा पुन्हा दिल्याने मतदार संघ बीजेपीकडे गेला. आता बीजेपीत सुद्धा तेच होत आहे. त्यामुळे कॉंग्रेसने अशोक मेश्राम यांना संधी द्यावी अशी माहिती त्यांनी विश्रामगृह बाभूळगाव येथे घेतलेल्या पत्र परिषदेत दिली.
आज पर्यंतच्या आमदारांनी मतदार संघात मोठी सुधारणा केली नाही. मतदारसंघात सिंचनाची मोठी समस्या आहे, अजूनही मूलभूत गरजांपासून अनेक गावे दूर आहेत, पांदण रस्त्यांमध्ये अनेक समस्या आहे, त्या लोकप्रतिनिधीनी सोडवायला पाहिजे होत्या. परंतु त्यांनी काहीच प्रयत्न केले नाही. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना वाऱ्यावर सोडले, त्यांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे. सोयाबीन, कापूस पिकांवर प्रक्रिया उद्योग सुरू केला नाही. बेरोजगारीमुळे तरुण व्यसनाधीन होत आहे, मतदार संघात एकही शासकीय महाविद्यालय सुरू केले नाही, क्रीडा क्षेत्रात काहीच भरीव काम लोकप्रतिनिधी यांनी केले नाही. त्यामुळे त्याच त्या लोकांना जनतेने नाकारले पाहिजे, नव्या विचारांना चालना मिळाली पाहिजे. आजपर्यंत आजी,माजी आमदार यांनी खोटी आश्वासने दिली व देत आहेत, आता मोर्चे काढून मतदारांची दिशाभूल करण्यात येत आहे. लोकांना काम करणारा उमेदवार हवा आहे. जनतेने संधी दिल्यास मतदारसंघाचा कायापालट करणार, रस्ता, वीज, शिक्षण, आरोग्य, निवारा, अन्न या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेंबळा प्रकल्पावर विद्युतीकरण करणे आवश्यक आहे, पर्यटन म्हणून विकास झाला पाहिजे, बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महादेव कोडापे, राजेश शर्मा, सैय्यद मुन्ना, युसूफ अली सैय्यद, महादेव मेश्राम, राजू मेश्राम उपस्थित होते.