आसेगाव देवी येथे गाय गोधन यात्रा उत्साहात
— गायी घोंगडीवर बसविण्याची स्पर्धा
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा। बाभूळगाव.
दिवाळी हा हजारो वर्षांचा इतिहास असलेला सण देश-विदेशात साजरा होतो. धनत्रयोदशी पासून सुरू होणारा हा दिवाळी सण आठवडाभर वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. पूर्व विदर्भातील अनेक ठिकाणी दिवाळीच्या पाडव्याला म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवशी गाय गोधन यात्रा भरविण्याची परंपरा आहे. बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव देवी येथे गेल्या ४० वर्षापासून गाय गोधन यात्रा साजरी केली जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळीच्या पाडव्याला घोंगडीवर गाई बसविण्याची स्पर्धा उत्साहपूर्ण संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून अनेक गावामधून शेतकरी व गोपालक स्पर्धकांनी भाग घेतला होता. गाई घोंगडीवर बसविण्याची स्पर्धा बघण्यासाठी गावतील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने गाय गोधन यात्रा उत्सवाचा आनंद सर्वांनी अनुभवला. गाय गोधन स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांमधून कमी वेळेत जास्त गाई घोंगडीवर बसवीनाऱ्यांची योग्य निवड करून त्यांना पारितोषिक व बक्षीसे देण्यात आली. कमी वेळेत जास्त गायी बसविनाऱ्यांमध्ये पहिला क्रमांक भारत राऊत (आसेगाव देवी), दुसरा क्रमांक घनशाम जाधव (चाणी कामटवाडा), तिसरा क्रमांक द्यानेश्वर पवार (कोठा), चौथा क्रमांक संतोष आडे (लखमापूर) आणि पाचवा क्रमांक बाबुसिंग आडे (आलेगाव) यांनी पटकावला. तर पाच गायींची सुंदर सजावट या स्पर्धेत सदानंद जुनघरे आसेगाव देवी यांचा प्रथम क्रमांक आला. आपल्या संस्कृतीत सण, उत्सव, परंपरा याला विशेष महत्व आहे, आपण निसर्गाचे आणि ईश्वराचे धन्यवाद मानण्यासाठी या दिवसाची वाट बघतो आणि दिवाळीचा सण झाल्यावर आपले उत्पादन बजारात विक्रीला घेऊन जातो. आणि येणार्या नव्या रब्बी हंगामाच्या तयारीला लागतो. सगळे सण यात्रा व उत्सव माणसाच्या जीवनातील निराशा दूर करून नवे रस्ते शोधणे व नवी कामे हाती घेण्यासाठी उत्साह निर्माण करतात. हीच परंपरा आसेगाव देवी येथील नागरिक अनेक वर्षांपासून जोपासत आहेत.