
उद्यापासून मिटनापूर येथे कबड्डीचा ‘ले पंगा’ !
खासदार चषक कबड्डीचे खुले सामने
प्रतिनिधी| बाभूळगाव :-
बाभूळगाव शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या मिटनापूर येथे दि. 16 फेब्रुवारीपासून थर्रार अनुभवायला मिळणार आहे. येथील जोशीला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून 16, 17 व 18 फेब्रुवारीला खासदार चषक अखिल भारतीय कबड्डीचे खुले सामने आयोजित केले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून लाखोंच्या बक्षिसांची लयलूट होणार असल्याने कबड्डीचा ‘ले पंगा’ अनुभवास मिळणार आहे.
कबड्डी सामन्याचे उद्घाटन सायंकाळी 5.30 वाजता खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके हे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे राहतील. या वेळी नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या कबड्डीचे स्पर्धेचे प्रथम बक्षीस एक लक्ष रुपये व द्वितीय बक्षीस 71 हजार रुपये, एकावन हजार रुपयाचे तृतीय बक्षीस, एकतीस हजार रुपयाचे चौथे बक्षीस, या सह वैयक्तिक, प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्याबाहेरील चमू भाग घेणार असल्याने सामने रोमहर्षक होणार आहेत. या कबड्डीच्या सामन्याचा परिसरातील जनतेने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक इमरान खान, शाहरुख खान, सलमान खान पठाण, कुणाल ठाकरे, निखिल शेळके, वसीम पठाण, अनवर खान, अयुब काशीक, जोशीला क्रीडा मंडळ मिटनापूर, ग्रामपंचायत मिटनापूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.