
“एक नमन गौरा, हरबोला हर हर महादेवच्या” घोषणांनी दणाणला परिसर
पोळ्याच्या दिवशी बैलाला गेरू, मटाठ्ठया व घुंगराचा साज.
झडत्यांची पारंपरिक लोकसंकृती:
प्रतिनिधी | बाभुळगाव
एक नमन गौरा परबती, हर बोला हर हर महादेव अशा झडत्यांचे स्वर ग्रामीण भागात ठिकठिकाणी कानावर पडत होते. याद्वारे तालुक्यातील लोकसंस्कृतीचेही दर्शन घडले. बैलजोड्यांना गेरूने रंगवून, बाशिंग, झुल, गळ्यात घंटा, घुंगरू, मटाक्यांद्वारे सजवण्यात आले होते. या पोळ्यात ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत बैलजोड्यांनी प्रवेश केला. त्यावेळी त्यांची ऐट बघण्यासारखी होती. हरहर महादेव, असा गजर कानी पडत होता.
बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकण्यात आले. ‘आज आवतण घ्या, उद्या जेवायला या’ या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते ‘वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी. देव कवा धावला गरिबांसाठी” एक नमन गौरा पार्वती,हर बोला हर-हर महादेव, हर महादव असा गजर पोळ्याच्या पूर्वसंध्येपासून सुरू झाला. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी ‘गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा, वरच्या राणातून आणली माती, ते दिली गुरूच्या हाती, गुरूनं घडवला महानंदी, तो नेला हो पोळ्यामंदी, एक नमन गौरा पारबती, हर बोला हर-हर महादेव’, अशा झडत्यांची लोकसंस्कृती कायम आहे.
बाभूळगाव नगर पंचायतचे आयोजन
बाभूळगाव नगर पंचायतकडून आयोजित बैलपोळ्यात सुदृढ बैल व उत्कृष्ट बाशिंगांना १८ हजाराची बक्षिसे ठेवण्यात आली होती.. सुदृढ बैल व बाशिंग सजावट या दोन भागात विभागणी करत प्रत्येकी तीन असे एकूण सहा बक्षीस बाभुळगाव नगर पंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यात बाशिंग सजावट विभागात प्रथम बक्षीस शेख आदम शेख रहीम, द्वितीय शेख नसीम शेख हबीब , तृतीय अनवर खान पठाण यांनी पटकावले. तसेच सुदृढ बैल गटात राजेंद्र इंगोले, शेख कदीर,अल्ताफ पठाण यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस पटकावले. बक्षीस वितरण बाभुळगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत चौधरी,रमेश मोते, भारत इंगोले,व मुख्याधिकारी डॉ पल्लवी सोटे ,पशु चिकित्सक पीयूष झोपे यांचे हस्ते पार पडले. यावेळी नगरसेवकांसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवला होता.



