
कृष्णापूर शिवारात शेतक-यावर रानडुकराचा हल्ला
वन विभागाने लक्ष देण्याची गरज
बाभूळगाव । प्रतिनिधी:-
शेतामध्ये काम करीत असताना शेतक-यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दि. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळ 4.30 ते 5 वाजताचे सुमारास कृष्णापूर शिवारात घडली. यातील गंभीररित्या जखमी झालेल्या शेतक-याचे नांव संजय गुलाबचंद गुगलीया, रा. यवतमाळ असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, संजय गुगलीया यांचे बाभूळगाव तालुक्यातील कृष्णापूर शिवारात गट नं. 28 हे शेत असून दि. 9 फेब्रुवारी रोजी ते सायंकाळी कापूस वेचणी करीता मजुर असल्याने शेतात उपस्थित होते. त्याच दरम्यान त्यांचेवर रानडुकराने अचानक हल्ला चढविला. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून पाठीला, पाया जबर दुखापत झाली. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आॅपरेशन करण्याचे सांगितले आहे. या प्रकरणी त्यांनी वनविभागाला पत्र दिले असून शासकीय नियमानुसार आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये तालुक्यात अनेक शेतक-यांना दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे वन विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.