ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव येथे नेत्रदान
…. ज्ञानेश्वर चौधरी यांच्या मृत्यू उपरांत परिवाराचा निर्णय
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा :- (बाभूळगाव):-
सर्व स्वप्ने डोळ्यात होती, पण नियतीने क्रूर डाव खेळला असा प्रत्यय बाभूळगावकरांनी अनुभवला. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे रेडीमेड कपडा व्यावसायिक ज्ञानेश्वर बाजीराव चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दि. १८ रोजी सायंकाळी निधन झाले. समाजभान राखत त्यांच्या मृत्यू उपरांत परिवाराने नेत्रदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयामुळे दोन अंध व्यक्ती पुन्हा जग पाहू शकणार आहेत.
बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६७ वर्षीय ज्ञानेश्वर बाजीराव चौधरी यांना ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव येथे आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. यावेळी कर्तव्यावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना मुसळे (मानकर), अधिपचारिका मनीषा धुंदाळे यांनी मृतकांचा मुलगा बालरोग तज्ञ डॉ. पंकज चौधरी व इतर नातेवाईक आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांना समुपदेशन केले. त्यावेळी त्यांचा मुलगा डॉ. पंकज याने वडिलांचे नेत्र दान करण्याचा निर्णय घेत जगासमोर आदर्श ठेवला. त्यांच्या या बहुमोल निर्णयामुळे दोन अंध व्यक्तींना जग बघण्याची संधी मिळणार आहे. या प्रक्रियेसाठी डॉ सुखदेव राठोड ; नेत्ररोग तज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ, डॉ. रमा बजोरिया वैद्यकीय अधिक्षक ग्रा. रू. बाभूळगाव यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. तसेच यावेळी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ लीना मुसळे(मानकर), अधिपरीचारीका मनिषा धुंदाळे, वैशाली गभणे, कक्ष सेविका सोनाली वाळके उपस्थित होते. विशेषता डॉ. रमा बजोरिया यांनी प्रसंगावधान साधून वसंतराव नाईक रुग्णालय यवतमाळ येथील नेत्रशल्यचिकित्सक डॉ सुधीर पेंडके नेत्ररोग विभाग प्रमुख , डॉ स्नेहल बोंडे सहाय्यक प्राध्यापक, डॉ अक्षय पडगीलवर, डॉ प्रणाली गिरी, डॉ सादिक बेनिवाले, डॉ सचिन मीना, डॉ जयदीप माथाने यांचेशी संपर्क साधून नेत्रदानाची प्रक्रिया उत्तमरीत्या पार पाडली. बाभूळगाव ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी प्रथम नेत्रदान दिनांक ३०/११/२३ ला मृतक अनिता राजेंद्र जांभूळकर ४५ वर्ष यांचे करण्यात आले होते.