
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राजस्व समाधान शिबिर
सावर मंडळातील ३८९२ लाभार्थींना विविध योजनांचा लाभ
प्रतिनिधी । बाभुळगाव
तालुक्यातील सावर महसूल मंडळात १४ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राजस्व समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन महसूल विभागामार्फत करण्यात आले. यात एकूण ३८९२ लाभार्थींनी विविध विभागांच्या योजना आणि दस्तऐवजांचा लाभ घेतला. शिबिराचे अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी उज्वला ढोले तर प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार मीरा पागोरे, तालुका कृषी अधिकारी कृतिका डेरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.रमा बाजोरिया, श्री.दावजी महाराज देवस्थानचे सुनील श्रीरसागर, उप सरपंच नितीन राठी, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष दिनेश गुल्हाने व्यासपीठावर उपस्थित होते.
शिबिरात महसूल विभागातर्फे पुरवठा, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, सेतू विभाग, आधार कार्ड, ७/१२ उतारा वितरण, फेरफार, शैक्षणिक दाखले व इतर सेवा देण्यात आल्या. तसेच भू-अभिलेख, कृषी, उमेद, महिला व बालकल्याण, आरोग्य, पंचायत, कामगार, सामाजिक वनीकरण, बचत गट, दुसरा नीबंधक, वन विभाग यांच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते मौजा दाभा येथील अनाथ प्राजक्ता बन्सोड व प्रज्वल बन्सोड या बहीण-भावंडांना अनाथ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सावर मंडळातील ग्रामसंघ व बचत गट विकासासाठी १.१७ कोटी रुपयाचा धनादेश देण्यात आला. तसेच नवीन रेशनकार्ड, ७/१२, आयुष्मान कार्ड, जन्मदाखला, आधारकार्ड व इतर प्रमाणपत्रे वितरित झाली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी, नायब तहसीलदार सय्यद यामीन, वाय.एम. कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संघर्ष राठोड, सेतू सुविधा केंद्राचे संचालक दिलीप वाघमारे, जय वाघमारे, सावर मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवकांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आशीष जयसिंगपुरे यांनी केले, तर आभार मंडळ अधिकारी गुजर यांनी व्यक्त केले.
तालुका आरोग्य विभागाने केली नागरिकांची तपासणी
या शिबिरामध्ये आरोग्य विभागाच्या चमूने शिबिरात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली. यात जनरल तपासणी ३२६, गरोदर माता तपासणी १९, डोळे तपासणी २१२, हिमोग्लोबीन ( लोहयुक्त प्रथिन) तपासणी १३०, सिकलसेल आणी बायोकेमिस्ट्र तपासणी ५०, रक्तदाब, शुगर/ मधुमेह तपासणी १५०, यांचेसह इतरही तपासण्या करण्यात आल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संघर्ष राठोड व आरोग्य विभागाने यासाठी विशेष परिश्रम घेतले.



