तुळशीच्या विवाहासाठी घरोघरी लगबग सुरू.
बाजारात ज्वारीच्या झोपडीसह बोरे, भाजी, आवळे अन् पूजा साहित्य खरेदीला वेग
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा। बाभुळगाव.
दिवाळी संपताच चाहुल लागलेल्या तुळशी विवाहाला मंगलवारपासून (दि. 12) प्रारंभ झाला आहे. त्यामुळे घरोघरी तसेच मंदिरात सार्वजनिक स्वरूपात लगबग सुरू झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी शहरात ठिकठिकाणी पूजा साहित्याची दुकाने सजली आहेत. त्यासाठी लागणारी ज्वारीची खोपटी, ऊस, बोर, भाजी, आवळा, लाह्या, प्रसाद आदी पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे.बाभुळगाव शहरात ठिकठिकाणी पूजा साहित्याची दुकाने सजली आहेत.
पाच दिवस चालणाऱ्या तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या पूजा साहित्याच्या खरेदी करिता बाजारपेठेमध्ये गर्दी होत आहे. महिला वर्ग तुळशी वृंदावन सजविण्यात, रंगवण्यात व्यस्त आहेत. शहरातील भारतमाता चौक, वस्ती स्थानक,बस स्थानक बाजार,मुख्य बाजार ओळ भागात विक्रेत्यांनी थाटलेल्या पुजा साहित्याच्या दुकानांमध्ये आबालवृद्धांची गर्दी दिसून येत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. आवळा, चिंच, मणी मंगळसूत्र, हळदीचे कापड, हिरव्या बांगड्या, ऊस, रांगोळी असे पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगीनघाई सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
तुळशी विवाहासाठी तुळशीचे रोप महत्त्वाचे आहे. तुळशी विवाहाप्रसंगी नवीन तुळशीची पुजा करून ती घराच्या आवारात लावली जाते.घराच्या अंगणातील तुळशी वृंदावने सजवण्यात लहानांबरोबर मोठ्यांनीही पुढाकार घेतला असून दरम्यान, घराघरात तुळशी विवाहाची खास तयारी सुरू झाली आहे. हिंदू परंपरेनुसार, तुळशी विवाह लावल्यानंतर घरातील लग्नकार्याला सुरूवात होते. त्यामुळे दिवाळीतील शेवटचा सण म्हणून तुळशी विवाहकडे पाहिले जाते.त्यासाठी प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.
साहित्य विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद
• तुळशी विवाहासाठी आवश्यक असलेल्या खोपट्या, ऊस चिंच, बोर, लाह्या, फोटो, ओटीचे सामान आदी घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असून त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
• पूजा साहित्य विक्रेता.
• हेमंत गुप्ता,बाभुळगाव.