बाभूळगाव तालुक्यातील दाभा येथील शेतक-याची आत्महत्या
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा| बाभूळगाव :
बाभूळगाव तालुक्यातील दाभा येथील शेतकरी गणपतराव श्रावनजी जळीतकर, वय 68 वर्ष यांनी सततची नापिकी व आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. गावाशेजारील शेतातील विहिरीत त्यांचा दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे कि, गणपतराव श्रावनजी जळीतकर, वय 68 वर्ष, रा. दाभा हे शेतीचा व्यवसाय करित होते. त्यांच्या कडे दाभा शिवारामध्ये साडे चार एकर शेती असुन वहीती स्वत करित होते. त्यांचे शेतामध्ये तिन-चार वर्षापासुन समाधानकारक पिक होत नव्हते व शेतीच्या उत्पन्नापासुन मन खचलेले होते. त्यातही गेल्या काही महिन्यांपासून त्यांना एका आजाराचा त्रास वाढला होता. त्यांचेवर औषध उपचार सुरु होते. तसेच त्यांचा नातु सुद्धा आजारी असल्याने त्यांचे बरेच पैसे खर्च झाले होते. स्वतःची व नातवाच्या प्रकृतीवर खर्च, शेतीचे उत्पन्न कमी अशा मानसिक विवंचनेत ते राहत होते व खचून गेले होते. त्यामुळे दि.5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा सुमारास ते कोणाला काहीही न सांगता घरून निघुन गेले होते. त्यांचा शोध घेने सुरु असतांना दि.6 रोजी सकाळी 08 वाजताच्या सुमारास दाभा गावालगत असलेल्या घावडे याचे शेतातील विहीरी मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सुखदेव तानबाजी खसाळे यांनी बाभूळगाव पोलिसात फिर्याद नोंदवली. रिपोर्ट वरुन सदरचा मर्ग नोद करुन पोलिसांनी तपासात घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लहूजी तावरे यांचे मार्गदर्शनात पोहेका संजय भुजाडे करीत आहे.