दिग्रस येथे आढळला अत्यंत विषारी दुर्मिळ पोवळा जातीचा साप
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | यवतमाळ :
दिग्रस येथील भिम नगर परिसरात विषारी साप दिसून आल्याची माहिती ४ डिसेंबर दुपारी एम एच २९ हेलपिंग हॅन्डस च्या सदस्यांना मिळाली. त्यावेळी दिग्रस तालुका अध्यक्ष प्रथमेश जाधव , निशांत बनसोड , आशीष भस्मे , विजय कांबळे , सुनिल तायडे , विक्रम राठोड , लखन रुडे , संकेत ढोरे , रुपाली खिराडे घटनास्थळी पोहचले. तिथे अत्यंत दुर्मिळ विषारी पोवळा साप आढळून आला. एम एच २९ हेलपिंग हँडस यवतमाळ शाखा दिग्रस तालुका अध्यक्ष सर्पमित्र प्रथमेश जाधव व तालुका उपाध्यक्ष निशांत बनसोड यांनी सापाचे सुखरूप रेस्कु अभियान राबविले. एम एच २९ हेलपिंग हॅन्डस चे संस्थापक अध्यक्ष निलेश मेश्राम यांनी पुढील मार्गदर्शन करत सापाची पाहणी करून वनविभागाला माहिती पोहचवली.
स्लेंडर कोरल स्नेक असे या सापाचे इंग्रजी नाव असून वैज्ञानिक नाव कॅलीओफीस मेलॅनुरस असे आहे. हा पूर्णपने विषारी साप आहे .तो निशाचर असला तरी कधी कधी दिवसाही आढळतो . विषारी सापातील सर्वात लहान साप व अत्यंत दुर्मिळ असल्याने क्वचितच आढळतो. डीवचला गेला असता शेपटी गोल करून शेपटी खालील लाल – नारंगी रंग प्रदर्शित करून चेतावनी देतो. दिसायला हुबेहुब काळतोंड्या या बिनविषारी सापा सारखा दिसतो. या सापाचे विषदंत खुपच लहान असल्याने मानसाच्या घट्ट कातडी मध्ये घुसत नाही आणि म्हणूनच या सापाच्या दंशाचे प्रमाण नगण्य आहे .आढळून आलेल्या सापाची लांबी जवळपास १ फुट इतकी असून याची माहिती वनपारिक्षेत्र अधिकारी अजय राऊत व प्रकाश जाधव यांना देऊन सापाला त्याच्या अधिवासात मुक्त करण्यात आले.