
पोलीसांनी दुचाकीचोर व बकरीचोरांच्या आवळल्या मुसक्या
बाभूळगाव | प्रतिनिधी :-
गेल्या आठवडाभारत पोलीस स्टेशन बाभुळगाव अंतर्गत मोटर सायकल चोरीचे चार गुन्हे तसेच बकरी चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सातत्यपूर्ण घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. या प्रकरणांचा तपास करण्यासाठी चार सदस्सीय पोलीसांची चमू येथील पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले असून यातील दुचाकीचोर व बकरीचोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या कारवाई मध्ये सुमारे १,५१,००० रू. किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. घारफळ येथे रामकृष्ण भागवत यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी क्र. एम.एच. ४०क्यु४९२० घारफळ येथुन चोरी गेली. त्यानंतर अनिल डफले रा. टेंभरी ता. हिंगणा जि. नागपुर यांची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी क्र. एम.एच.४० बिझेड ०८९६ हि सारफळी येथुन चोरी झाली. अतुल राजेंद्र जिरापुरे रा.सरूळ यांची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी क्र. एम.एच.२९एएस३११८ सरूळ येथुन चोरी गेली. तर शरद जिचकार रा. घारफळ यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो दुचाकी क्र.एम.एच.२९एए ६१७१ घारफळ येथुन चोरी गेली. अश्या चार दुचाकी एकापाठोपाठ चोरी गेल्याने तालुक्यात दुचाकीचोरट्यांचा सुळसुळाट झाल्याच्या चर्चांना उधान आले होते. त्यात भरीसभर योंगेद्र नेवारे रा. परसोडी यांची एक मोठी बकरी परसोडी येथुन चोरी गेली. बकरी चोरीच्या घटनेतील आरोपीचा सुगावा घेत पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. गुन्हयाचे तपासामध्ये पोलीस पथकाने घटनास्थळ व मार्गावरील सि.सि.टी.व्ही. कॅमेरे चेक केले. त्यामध्ये आरोपी पुलगाव पर्यंत गेल्याचा सुगावा लागला. सि.सि.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक विश्लेषन व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी प्रथम धनराज चटपकार वय २१ वर्ष, रा.पुलगाव ता. देवळी जि. वर्धा व ४ विधिसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले. दुचाकीचोरीचे एकुण ४ गुन्हे व बकरी चोरीचा १ गुन्हा उघड करून एकुण १,५१,००० रू. किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. हि कारवाई पोलिस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. एल.डी. तावरे, पथकातील सपोनि हेमंत चौधरी, पो.हवा. गणेश शिंदे, निलेश भुसे, पोकों विश्वास थुल, भुषन बिरे यांनी केली.



