दुचाकी झाडावर धडकल्याने प्रेमी युगुलाचा अंत…
बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा धरण परिसरातील घटना
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभुळगाव.
बाभुळगाव तालुक्यातील खडकसावंगा फाट्यावरून बेंबळा धरणाकडे जात असताना सुझुकी जिक्सर दुचाकी गाडी क्रं. एम एच २९ सी डी १५०४ वळणावरून थेट निंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोघांनाही डोक्याला जबर मार लागल्याने दोंघांचाही मृत्यू झाला. सदर घटना शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात प्रेमी युगुलाचा अंत झाला.
बाभूळगाव तालुक्यातील वीरखेड येथील रहिवासी असलेला तेजस पुंजाराम सोयाम,वय २० वर्षे हा त्याची मैत्रीण शिवानी संजय सुरपाम वय १९ रा.मालापुर ता. बाभुळगाव हे बाभुळगाव बस स्थानकाकडून बेंबळा धरणाकडे तेजसच्या सुझुकी जिक्सर ने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जात होते. दरम्यान वळणावर भरधाव वेगात असलेली दुचाकी अनियंत्रित झाल्याने थेट जाऊन रस्त्यालगतच्या निंबाच्या झाडावर धडकली. झाडाच्या टणक बुंध्यावर आदळल्याने दोघांच्याही डोक्याला व हनुवटीला जोरदार मार लागला. या अपघातात युवती जागेवरच गतप्राण झाली. तर युवकास प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव येथे दाखल करण्यात आले. तोवर त्यानेही प्राण सोडला होता. सदर युवक हा टोपल्या ह्या टोपण नावाने ओळखल्या जात असून रेतीच्या ट्रकवर चालक म्हणून कामाला होता. तो त्याच्या मालकाची दुचाकी घेऊन आला होता. तर शिवानी ही त्याची मैत्रीण असून ते दोघे धरणावर फेरफटका मारण्यासाठी दुचाकीने जात होते. वाटेत एका वळणावर त्यांचा अपघात झाला, असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात झाल्यानंतर खडकसावंगा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही अपघातग्रस्तांना ग्रामीण रुग्णालयात आणले.