Homeमहाराष्ट्रबाभुळगावनदिच्या पुलावरील लोखंडी कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता ?

नदिच्या पुलावरील लोखंडी कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता ?

नदिच्या पुलावरील लोखंडी कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता ?

 सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

-: बाभूळगाव । प्रतिनिधी :-

बाभूळगाव शहरालागून वाहणा-या नारायणी नदिवर बस स्थानकाच्या रस्त्यावर असलेल्या पुलावरील लोखंडी पाईपचे कठडे दोन्ही बाजूंनी तुटले आहेत. त्यामुळे पुलावरून जाणा-या वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक महिन्यांपासून हे तुटलेले कठडे अपघाताला आमंत्रण देत असताना सार्जनिक बांधकाम विभागाला मात्र कठडे दुरुस्तीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झाले असून रात्रीच्यावेळी पुलावरून जाताना वाहनचालकांना अनेक अडचणी येत आहेत.

                बाभूळगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे दररोज वर्दळ असते. बसस्थानकावरून शहरात येण्यासाठी असलेल्या रस्त्यांपैकी हा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची रेलचेल पहावयास मिळते. याच रस्त्यावर पाच ते सहा विद्यालये असून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मोटर सायकल, सायकली व पायदळ जाणे येणे करतात. बाभूळगाव कळंब मार्गाचे काम नव्यानेच झाले असून रस्ता रूंद करण्यात आला आहे. मात्र पुलाचा आकार जैसे थेच असल्याने पुलाचा भाग अरूंद आहे. त्यामुळे यावरून जाणा-यांना सुरक्षेच्या दृष्टीने कठडा महत्त्वाचा आहे. अनेकवेळा मोठी मालवाहू वाहने या पुलावर आल्यास इतररांना जाताना अनेक अडचणी येतात. अश्यावेळी दुचाकीस्वारांना पुलावरून खाली नदिपात्रात पडण्याची भिती नेहमीच असते. कठड्यापासून वाहने अंतर राखून चालत असल्याने ते अगदी जवळजवळ येताना दिसून आले आहेत. यातूनच काही अपघात घडलेले आहेत. दोन महिन्यापुर्वी अश्याच एका अपघातात तालुक्यातील एका युवकाला प्राण गमवावे लागले होते. तेव्हाही कठड्याच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग साफ दुर्लक्ष करीत असल्याने, या विभागाला आणखी काही मोठ्या  दुर्घटनेची प्रतीक्षा आहे काय? असा सवाल जनता विचारत आहे.

नदिला पूर आल्याने कठडे तुटले….. अक्षय राऊत, नगर सेवक, न.पं. बाभूळगाव

नदिला मागील वर्षी आलेल्या पूराच्या तडाख्यात पुलावरील कठडे तूटले आहेत. मागील वर्षी नदिला दोन ते तिन वेळा मोठे पूर आले होते. त्यावेळी नदिच्या प्रवाहात आलेल्या लाकडाच्या ओंडक्यांसोबत कठड्याचे लोखंडी पाईप तूटून वाहून गेले. तेव्हा पासूनच या कठड्याच्या दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाकडे नगर पंचायतने पाठपुरावा केला आहे. मात्र बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

बाभूळगावच्या कठड्याचे काम रस्ते समितीकडे प्रलंबित आहे….. गौरव मालवे, उपअभियंता, सा.बां.उपविभाग कळंब

तालुक्यातील वेणी, नायगाव व बाभूळगाव येथील पुलांच्या कठड्याचे काम काही दिवसांपुर्वी प्रस्तावित केले होते. रस्ते सुरक्षा समितीच्या अहवालाच्या आधारावर त्यापैकी वेणी व नायगाव येथील कामांना मंजुरी मिळाली असून ते काम सुरू होईल. मात्र बाभूळगाव येथील पुलाच्या कठड्याचे काम समितीकडे प्रलंबीत आहे. रस्त्याचे काम केलेल्या कंत्राटदाराला तात्पुरते रेलिंग लावण्याची विनंती केली होती, मात्र त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

समस्या दूर करण्यात कोणालाच ‘स्वारस्य’ नाही… रवींद्र काळे, माजी उप नगराध्यक्ष

बाभूळगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाला शहरालगतच्या  कठडा दुरूस्ती संदर्भात विचारले असता, त्यांनी थेट कळंब उपविभागाकडे बोट दाखविले आहे. कळंब-बाभूळगाव रस्त्याचे बांधकाम कळंब उपविभागाने केल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीचेही काम त्यांचेकडेच असल्याचे समजते. दुरुस्तीचे काम कमी खर्चाचे असल्यामुळे डोळ्यादेखत दिसत असलेली समस्या दूर करण्यात कोणालाच ‘स्वारस्य’ नसल्याचे दिसून येते. दोन कार्यालयाच्या वादात सदर कठडा अडकला असल्याचे यावरून स्पष्ट होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img