नांदेसावंगीच्या भैय्यापूर घाटात रेती तस्करांचा उच्छाद !
धुळीमुळे शेतीपिकांचे नुकसान, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभूळगाव
तालुक्यातील बेंबळा नदिपात्रातील नांदेसावंगी गावाजवळ असलेला भैय्यापूर रेतीघाट रेती तस्करांनी अक्षरश: पोखरून काढला आहे. नदिपात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे करून त्यातून मौल्यवान रेतीसाठा उपसा करून त्याची अवैध वाहतुक सर्रासपणे केली जात आहे. नदिपात्रातून रेती भरलेले अनेक ट्रॅक्टर शेतक-यांसाठी असलेल्या पांदणवरून जात असल्याने उडणा-या धुळीमुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. त्याच प्रमाणे ही अवैध वाहतुक गावातून होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाभूळगाव तालुक्यातील रेती घाटांचा शासकीय लिलाव झालेला नाही. त्यामुळे रेती तस्करांनी चोरट्या मार्गाने रेती उपसा करून त्याची वाहतूक करण्यास सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणूकीच्या काळात तालुका प्रशासन निवडणूक कामी गुंतल्याची संधी साधून या रेती तस्करांनी तालुक्यातील अनेक रेतीघाटांना लक्ष्य केले. आजही भरदिवसा सर्रासपणे रेतीचा उपसा करून त्याची वाहतुक केली जात आहे. तालुक्यातील नांदेसावंगी येथील बेंबळा नदिपात्रात असलेल्या भैय्यापूर रेती घाटावर दररोज विस ते पंचेवीस ट्रॅक्टर रांगेने उभे असल्याचे पहावयास मिळतात. या ठिकाणी बाभूळगाव परिसरातील अनेक रेती चोरटे सक्रीय झालेले आढळून आले आहेत. नांदेसावंगी गावातून रेतीचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात असून वाहनाच्या उडणा-या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्थमा, दमा, खोकल्याचे रूग्ण वाढण्याची शक्यता या गावात निर्माण झाली आहे. गावातील शाळेजवळून ही वाहने भरधाव जात असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जिवीत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेती घाटापासून निघालेल्या ट्रॅक्टरच्या उडणा-या धुळीमुळे रस्त्यालगतच्या शेतांतील तूर, कपाशी पिकांचे नुकसान होत आहे. यासर्व प्रकाराकडे संबंधीत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
रेती तस्करांना कुणाचेही भय उरले नाही
तालुक्यातील रेती घाटांवरून सर्रासपणे होत असलेली अवैध रेती वाहतूक पाहता या रेती तस्करांना कुणाचेही भय उरले नसल्याचे दिसून येते. अगदी दिवसा ढवळ्या विना क्रमांकाचे टॅªक्टर, ट्राॅलीच्या आधारे रेतीची खुलेआम वाहतूक केली जाते. या रस्त्यावर अनेक ठिकाणी रेतीचे ढीग पहावयास मिळतात. शेतीच्या कामासाठी घेण्यात आलेले नवनवे ट्रॅक्टर अनेकांनी अवैध रेती वाहतुकीच्या कामी लावलेले आहेत. विना क्रमांकाचे ट्रॅक्टर असल्याने अपघात झाल्यास किंवा प्रशासनाने पाठलाग केल्यास रेती तस्करांना पळून जाण्यात त्याचा उपयोग होत असल्याचे दिसते.