
नांदेसावंगी घाटातून दिवसाकाठी दिडशे ब्रास रेतीचा अवैध उपसा ?
मजुर मिळत नसल्याने फावड्याने रेतीचे उत्खनन
रहदारीच्या रस्त्यावर लागले मोठमोठे रेतीचे ढीग
-:दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा :-
बाभूळगाव तालुका रेतीच्या व्यवसायाबाबतीत सातत्याने चर्चेत आहे. या ठिकाणी असलेल्या बेंबळा, वर्धा नदिमधून मौल्यवान अशी रेती उपलब्ध असल्याने या रेतीला मोठी मागणी आहे. तालुक्यात शासकीय दरबारी सुमारे दहा अधिकृत रेती घाट आहेत. त्यांचा शासकीय लिलाव करून शासनाला महसुल प्राप्त होत असतो. मात्र गेल्या तीन वर्षापासून पर्यावरणाच्या व इतर काही कारणांनी शासनाने रेती घाटांचा लिलाव केला नाही. परिणामी या ठिकाणी असलेल्या मौल्यवान संपदेवर अवैध रेती व्यावसायिकांनी अक्षरश: हल्ला चढविला आहे. आजच्या घडीला नांदेसावंगी संगमाजवळील नदिपात्रातून दररोज दिडशेहून अधिक ब्रास रेतीचा उपसा करण्यात येत आहे. पंरतु नदिपात्रात उतरून रेती काढण्यासाठी मजुर उपलब्ध होत नसल्याने या अवैध रेती व्यावसायिकांनी नवी शक्कल अंमलात आणली असून भल्या मोठ्या पोलादी फावड्याच्या साह्याने नदिपात्रातून रेतीचा दिवसरात्र उपसा करून त्याचे ढीग लावण्यात येत आहेत. याच रेतीला घाटाकडे जाणा-या रहदारीच्या रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टरद्वारे नेवून त्याचे तिथेही मोठमोठे ढीग लावण्यात येत आहे.
तालुक्यातील सर्व रेतीघाट पिंजून काढल्यानंतर अवैध रेती व्यावसायिकांपैकी काहींनी घाटांदरम्यान असलेल्या नदिपात्रात आता रेतीचा शोध घेवून तेथून रेतीचा उपसा करणे सुरू केले आहे. असा प्रकार श्रीसंगमेश्वर महादेव मंदिराजवळील बेंबळा व वर्धा नदिच्या संगमाच्या नदिपात्रात अहोरात्र घडत आहे. हा भाग नांदेसावंगी या गावालगत असल्याने या ठिकाणाला नांदेसावंगीचा घाट असे या अवैध रेती व्यावसायिकांकडून संबोधले जात आहे. या ठिकाणातून दिवसरात्र शेकडो ब्रास रेतीचा उपसा होत असल्याने शासनाच्या कोट्यावधी रूपयाचा महसुल या अवैध रेती व्यावसायिकांच्या घश्यात चालला आहे.

रेतीचा उपसा करण्यासाठी एक भलेमोठे पोलादी फावडे वापरण्यात येत आहे. या फावड्याला लोखंडी साखळदंडाच्या साह्याने ट्रॅक्टरच्या रोटरला लावण्यात येते. त्यानंतर दोन नायलाॅन दोरींच्या साह्याने वेगात हे फावडे नदिच्या पात्रात सोडले जाते. नदिपात्रात मधोमध फावडे गेल्याबरोबर त्याला थांबवून लगेच त्याच वेगाने परत काठावर ओढले जाते. फावडे वजनदार असल्याने ते नदिच्या तळापर्यंत पोहचते व परत येताना बारीक व मौल्यवान रेती ओढून काठावर आणली जाते. या ठिकाणी रेतीचा साठा करण्यात येतो. एका फावड्यात एकावेळी किमान पाव ब्रास रेती ओढली जाते. पाच फावड्यामध्ये एक ट्रॅक्टर भरतो. या प्रकारे एक फावडे एका दिवसात किमान चाळीस ट्रॅक्टर रेतीचा उपसा करते. असे या ठिकाणी पाच फावडे सतत काम करीत आहेत, असे दिसून आले आहे.
स्थानिक प्रशासनाने घेतले झोपेचे सोंग…. की हेतुपुरस्पर दुर्लक्ष?
तालुक्यातील नांदेसावंगी गावाजवळी नदिपात्रातून दररोज शेकडो ब्रास रेतीचा उपसा करून त्याची ट्रॅक्टर, ट्रक द्वारे दिवस रात्र वाहतुक होत असताना स्थानिक प्रशासनाचे याकडे लक्ष जावू नये, किवा हि बाब प्रशासनाच्या निदर्शनास येवू नये या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बाबत येथील कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील यांना माहिती असतानाही ते दुर्लक्ष का करीत आहेत? यावरून कर्मचा-यांची मोठी चमू या अवैध रेती व्यावसायिकांशी हातमिळवणी तर करून नाही ? अश्या चर्चांना आता तालुक्यात उधाण आले आहे.
गुंड प्रवृत्तीच्या अवैध रेती व्यावसायिकांचा घाटावर बोलबाला
या ठिकाणी रेतीचा उपसा करणारे अवैध रेती व्यावसायिक प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून त्यांचेशी आर्थिक उलाढाल करून राजरोसपणे रेतीघाटावर वावरत असल्याचे दिसून येते. प्रशासनच आपल्या सोबत असल्याने त्यांचे मनोबल कमालीचे वाढलेले असल्याने त्यांचा बोलबाला या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे कुणीही या रेती घाटांवर कारवाई करण्यासाठी पुढे जात नाही. आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती प्रशासनाची झाली आहे. महसुल विभागाने नेमलेल्या चमूंनी या ठिकाणी अद्यापही “व्हिजीट” दिली नाही. यावरून हेच स्पष्ट होते.