परभणी येथील संविधान विटंबनेचा बाभुळगाव येथे निषेध
तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभुळगाव
परभणी येथे झालेल्या भारतीय संविधान विटंबन प्रकरणाचा बाभुळगाव येथे निषेध करून या प्रकरणातील दोषींना कडक शासन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून करण्यात आली. बाभुळगाव तालुक्यातील आंबेडकरी जनता यांनी त्या घटनेचा निषेध नोंदवला असून विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. या संबंधीचे निवेदन दि. २० रोजी नायब तहसीलदार वाय.एम. कांबळे यांनी स्वीकारले.
सदर घटनेतील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे. निष्पाप भीमसैनिकांना पोलीस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली असून यात सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांचा मृत्यू झाला आहे. या अमानुष घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याबाबत ताबडतोब शासनाने योग्य ती चौकशी करून आरोपीस कडक शासन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सोबतच पोलिसांच्या मारहाणी मध्ये ज्या भीमसैनिकाचा मृत्यू झाला त्याच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी व भीमसैनिकावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. व तसे निवेदन तहसीलदार बाभुळगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आले. यावेळी पराग पिसे, उत्तम मनवर, कृष्णा रंगारी, सुधाकर गडलिंग, शशांक इंगोले, विनायक माहुरे, ललित मून, चेतन वंजारी, योगेंद्र खडसे, सुमेध नगराळे, गजू कुंडेकर, उमेश दातार, अशोक तायवाडे, दिलीप शेंडे, आदी भीमसैनिक उपस्थित होते.