
प्रताप विद्यालयात महाराजस्व अभियान अंतर्गत शिबीर
— पस्तीस शासकीय प्रमाणपत्रांचे केले वितरण—
बाभूळगाव | प्रतिनिधी:-
बाभूळगाव महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचे विविध प्रमाणपत्र काढण्याकरिता स्थानिक प्रताप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिबिर घेण्यात आले. यावेळी निवासी तहसीलदार दिलीप बदकी, संस्थेचे सचिव जयंत घोंगे, मंडळ अधिकारी तथा नोडल अधिकारी प्रफुल घोडे, केंद्रप्रमुख मेहबूब शेख सर, संचालक शशिकांत कापसे, मुख्याध्यापिका स्वाती घोडे उपमुख्याध्यापक उमाकांत राठोड, पर्यवेक्षक मनोज नगराळे, तलाठी निखिल सुने, अभय जाधव, स्वाती धुळे, प्रणय भोयर, देवेंद्र आत्राम, राजेंद्र जीवतोडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्रमाणपत्र काढण्यासाठी वेगवेगळ्या गावावरून पालक आणि पाल्य यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या शिबिरात सेतू सुविधा केंद्र संचालक आशिष गुप्ता यांचे माध्यमातून 35 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ज्यामध्ये जात प्रमाणपत्र 10, अधिवास 11, नॉन क्रिमिलियर 05, राष्ट्रीयत्व 04, उत्पन्न प्रमाणपत्र 05, इत्यादींचा समावेश होता. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कुठलीही शैक्षणिक अडचण निर्माण होऊ नये या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. निवासी नायब तहसीलदार बदकी यांनी तात्काळ प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन उपस्थितांना दिले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
तालुक्यात विविध ठिकाणी भरणार शिबिरे
महाराजस्व अभियान अंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, तालुक्यात मातोश्री नानीबाई घारफळकर विद्यालय 9 जुलै रोजी गट शिक्षणाधिकारी गणेश मैघणे, ग्राम पंचायत मादनी येथे १६ जुलै रोजी नायब तहसीलदार सुनंदा राऊत तर ग्राम पंचायत दाभा येथे २७ जुलै रोजी निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी याच्या अध्यक्षतेखाली शिबिरांचे नियोजन करण्यात आलेले आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्यात सुद्धा या प्रकारे विविध ठिकाणी शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.