
बाभुळगावात व्यसनमुक्तीसाठी पेटली होळी
बाभुळगाव:-
होळीच्या शुभमुहूर्तावर २ मार्च रोजी सायंकाळी बाभुळगावात एका वेगळ्या आणि महत्त्वपूर्ण ‘व्यसनमुक्ती होळी’चे आयोजन करण्यात आले. समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्राने भारतमाता चौक येथे हा अभिनव कार्यक्रम राबवण्यात आला. ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या हस्ते दारूच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्या, सिगारेटची पाकिटे आणि गुटख्यासारख्या व्यसनांच्या प्रतीकांना होळीच्या अग्नीत जाळून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.
सामान्यतः होळीच्या दिवशी लोक वाईट गोष्टी आणि जुन्या आठवणी होळीत जाळून टाकतात. त्याच धर्तीवर, या ‘व्यसनमुक्ती होळी’मध्ये व्यसनाला एक वाईट सवय मानून, दारू, सिगारेट किंवा इतर व्यसनांच्या वस्तू प्रतीकात्मक स्वरूपात जाळण्यात आल्या. समाजाला लागलेले हे व्यसन आयुष्यातून कायमचे काढून टाकावे, असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला. एका क्षणाच्या सुखासाठी आपण आयुष्यभराची किंमत मोजतो. त्यामुळे व्यसनांचा त्याग करून एक निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचा संकल्प करण्याचे आवाहन उपस्थित नागरिकांनी केले. नशाबंदी मंडळ महाराष्ट्रच्या जिल्हा संघटक ॲडव्होकेट रोशनी वानोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाभुळगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून हा ‘व्यसनमुक्ती होळी’चा कार्यक्रम सातत्याने राबविन्यात येत आहे. यावेळी मर्दानी खेळ असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक प्रीतम सोनोने, व्यसन मुक्ती मंडळ तालुका संघटक योगेश वानोडे, सत्यम पाटणकर, विशाल पिसे, सागर गारगाटे, शहेजाद शेख, राजू नवाडे, आदित्य फुलकर, गजू कोटेकर, संतोष काशील,व पोलीस कर्मचारी आदींची उपस्थिती होती.




