
बाभूळगावकर अनुभवणार सर्जा-राजाचा थर्रार
पालकमंत्री चषक हिंदकेसरी शंकरपटाचे आयोजन
बाभूळगाव। प्रतिनिधी:-
बाभूळगाव येथे पालकमंत्री चषक हिंदकेसरी शंकरपट व कृषिप्रदर्शनीचे आयोजन दि. 15, 16 व 17 मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. बसस्थानकाजवळील कोपरा मार्गावरील गुगलिया यांचे शेतात शंकरपट भरणार असून या निमित्ताने तालुका वासियांना सर्जा-राजाचा थर्रार अनुभवता येणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन दि. 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांचे हस्ते होणार असून यावेळी विशेष अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, मध्यवर्ती सहकारी बँक संचाल अमन गावंडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दौलतकार हे राहणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेर अर्बनचे महाप्रबंधक प्रदीप झाडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष डाॅ.निरज वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता इंदरचंद मुथा, पोलीस निरीक्षक लहुजी तावरे, प्रभारी तहसिलदार दिलीप बदकी, नायब तहसिलदार सैय्यद यामीन, बाजार समिती संचालिका आशा ठाकरे, सचिव विलास गायकवाड, वेणीचे माजी सरपंच विशाल डंभारे, माजी नगरसेवक उध्दवराव साबळे, यवतमाळ तालुका प्रमुख योगेश वर्मा, कळंब तालुकाप्रमुख अभिजीत पांडे, युवा उद्योजक अभय गुगलीया, आसेगाव देवी सरपंच सचिन चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. दि. 16 रोजी सायंकाळी 6.30 वाजता लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील यांचा बहारदार कार्यक्रम विशेष आकर्षण असणार आहे. शंकरपटामध्ये अ-गट प्रथम बक्षीस एक लाख एक हजार रू., ब-गट प्रथम बक्षीस 71 हजार रू., तालुका गट प्रथम बक्षीस 11 हजार रू. या प्रमाणे राहतील. तसेच तीनही गट मिळून एकुण 38 बक्षीसे राहणार असुन एकुण 7 लाख 51 हजाराची लूट होणार आहे. शंकरपटाचे आयोजन सचिन महल्ले मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या शंकरपट, कृषिप्रदर्शनी, हिंदवी पाटील यांच्या बहारदार कार्यक्रमाचा आस्वाद तालुक्यातील गावक-यांनी घ्यावा असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुने, उपाध्यक्ष स्वप्नील मुडे, सचिव चेतन गावंडे, सतिश भांगे, युवराज महानूर यांनी केले आहे.

बाभूळगावकरांना हिंदवी पाटील देणार लावणीची मेजवानी
तब्बल पंचेविस वर्षांनंतर बाभूळगाव येथे महाराष्ट्राची लोककला लावणीचा बहारदार कार्यक्रम होत आहे. या आधी सुप्रसिध्द लावणी सम्राट सुरेखा कुडची यांचा कार्यक्रम बाभूळगाव शहरात झाला होता. तेव्हा पासून लावणीचे आयोजन तालुक्यात कुठेही झाले नाही. आता या रोमहर्षक नृत्य व दर्जेदार गीतांनी भरलेल्या लोककलेला बघण्याची संधी मिळणार आहे. लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील ह्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात परिचित असून त्यांनी लावणी या कलेला प्रसिध्दी मिळवून दिली आहे. आजच्या आघाडीच्या नृत्यांगणांमध्ये त्यांची गणना होते. लावणीच नव्हे तर चित्रपट गीतांवर प्रेक्षकांना तालावर थिरकवणारी हिंदवी पाटील यांच्या ‘‘पाटलाचा बैलगाडा’’, ‘‘अहो पाव्हणं जेवला काय’’ आदि लावण्यांनी युवकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. येत्या 16 मार्चला सायंकाळी 7 वाजता शंकरपटाच्या निमित्ताने लावणीचा बहारदार कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

डबल विदर्भ केसरी विजेता ‘‘टायगर’’ने भरवली इतरांच्या मनात धडकी
या शंकरपटात धावपट्टीवर जलवा दाखविणारा डबल विदर्भ केसरीचा खिताब नावावर असलेला ‘‘टायगर’’ सहभागी होणार आहे. आयोजकांनी याबद्दल सांगितले की, टायगर जेव्हा दावणीला बांधला जातो, तेव्हाच त्याच्या विजयाचे संकेत तो देतो. वा-याच्या वेगापेक्षाही सुसाट वेगाने धावणारा अशी टायगरची ओळख अख्या महाराष्ट्रात आहे. मैसुरी खिल्लारी जातीचा तीन वर्षाचा युवा धावक बैल ‘‘टायगर’’ने आता पर्यंत अनेक शंकरपटांमध्ये पन्नासच्यावर पारितोषिके पटकावली आहेत. त्यात सलग दोन वेळा विदर्भ केसरीचा तो विजेता ठरला आहे.