बाभूळगाव आठवडी बाजारात मोहोळ उडाल्याने व्यापारी, नागरिकांची धावपळ.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभुळगाव
बाभुळगाव येथील आठवडी बाजारात असलेल्या पिंपळाच्या झाडावरील मोहोळ गुरुवारला दुपारी अचानक उडाल्यामुळे व्यापारी, नागरिकांची तारांबळ उडाली यात अनेक जण जखमी झाल्याची घटना दिनांक 28 नोव्हेंबर च्या दुपारी घडली.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या बाभुळगाव येथील आठवडी बाजार गुरुवारला असतो.या दिवशी यवतमाळ, धामणगाव, कळंब शिवाय आजूबाजूच्या गावातील व्यापारी आपला भाजीपाला विक्रीकरिता घेऊन येतात.दिनांक 28 नोव्हेंबर च्या दुपारी अचानकपणे आठवडी बाजारामध्ये असलेल्या पिंपळाच्या झाडावरील आग्या मोहोळ उडाल्याने सदर माशांनी अनेकांची तारांबळ उडवून टाकली. आईला मुलगा भारी अशा पद्धतीने लोक सैरावैरा पळत सुटले यात काही लोक धावताना जमिनीवर पडून जखमी झाले.बाजाराला आलेल्या काही महिलांनी आपल्या मुलाला टाकून पळ काढला. भाजीपाला विक्री करणारे धामणगावचे तिघेजण जखमी झाले. रुग्णालयात किरकोळ उपचार करून सर्वांना सुट्टी देण्यात आली. नगर पंचायतीने सदर झाड तोडून टाकावे अशी मागणी व्यापारी, नागरिकां कडून केली जात आहे.