
बाभूळगाव नगर पंचायत समोर अतिक्रमण धारकांनी दिला ठिय्या
पन्नास वर्षापासूनच्या रहिवाश्यांची पट्ट्यांची मागणी
बाभूळगाव | प्रतिनिधी :-
नगर पंचायत बाभूळगावच्या हद्दीत गेल्या पन्नास वर्षांपासून शासकीय, निमशासकीय जागांवर अतिक्रमण करून राहत असलेल्या वार्ड क्र. १ मधील रहिवाश्यांचे अतिक्रमण नियमित करण्यात यावे, शासनाच्या 17 नोव्हेंबर 2018 च्या जीआरची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी येथील रहिवाश्यांनी दि. 31 जानेवारी रोजी नगर पंचायत समोर धरणे आंदोलन केले. रहिवासी पट्टे नसल्यामुळे येथील रहिवासी शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत.
बाभूळगाव नगर पंचायत हद्दीतील वार्ड क्र. १ मधील शासकीय व निमशासकीय जागेवरील अतिक्रमणधारक मागील 50 वर्षापासून येथील जागेवर घरे बांधून राहात आहेत. अतिक्रमण धारकांचे पट्टे नियमानुकूल करण्याबाबत शासनाचा सन 2018 चा शासन निर्णय नुसार आदेश पारीत करून अतिक्रमण नियमानुकूल करून अतिक्रमण धारकांना रहिवासी पट््टे देण्याचा आदेश झाला आहे. परंतु वारंवार निवेदने देवूनही येथील नगर पंचायत प्रशासनाने सदर आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे येथील रहिवासी असुन सुद्धा घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाच्या भेदभावपुर्ण व मनमानी कारभाराच्या निषेधार्थ येथिल नागरिकांनी दि. 31 जानेवारी रोजी नगर पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी प्रशासनाने या विषयाची तत्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी धरमचंद छल्लाणी, कृष्णा ढाले, शेख आरिफ छवारे, गजानन तिवसकर, रूपाली येवतीकर, प्रकाश उमरे, सुनिल पोलकडे, संगिता ठोंबरे, सिराज लियाकत अली, सुभाष पिसे, सुरज श्रुंगारे, स्वाती रेड्डी, प्रभा जयसिंगपुरे, शेख मुस्ताक, जिजा कासार, सुनिता गुजर, लिला कुमरे, शशीकला जांभुळकर, प्रणिता कोचपटे, इश्वर बनकर, किशोर सहारे, शे. अकरम, शे. सलमान, धर्मु लोहटे, विश्वास आगरकर, शेख जुबेर, ज्ञानेश्वर मोहनकर, नासिरखाँ पठाण, अ. रशीद अ. सत्तार, शेख सलीम, जाकीर मुल्ला यांचेसह येथील असंख्य रहिवासी उपस्थित होते
आम्ही सतत पाठपुरावा करणार आहोत…. अक्षय राऊत, नगर सेवक वार्ड क्र. १,
नगर पंचायतच्या वतीने संबंधित जागा हस्तांतरित करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. या संदर्भात आम्ही सतत पाठपुरावा करणार आहोत. याच प्रकरणी लोकसभा निवडणुकीचे वेळी विद्यमान आमदार तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी येथील जनतेला दोन महिन्यात पट्टे देण्याचे आश्वासन दिले होते. आता त्यांनी जबाबदारी घेवून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. व आम्हाला सहकार्य करावे.
कोणतीही कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करणार …. धरमचंद छल्लानी, आंदोलनकर्ता
या गंभीर विषयाला ऐकून घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी, किंवा तहसिलदार यांनी भेट दिली नाही. त्याबाबत आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करीत आहोत. त्यामुळे आंदोलनात सहभागी नागरिकांनी प्रशासनाविरूध्द रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणाबाबत येत्या 15 दिवसांत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास आम्हाला जिल्हास्तरावर तीव्र स्वरूपात आंदोलन करावे लागेल.