
बाभूळगाव शहराच्या दुर्लक्षित प्रश्नांकडे पालकमंत्र्यानी लक्ष द्यावे !
— रोजगार विषयक कामांसाठी दिली निवेदने—
प्रतिनिधी । बाभुळगावः-
बाभुळगाव ग्राम पंचायतचे सन २०१५ ला नगर पंचायतमध्ये रूपांतर झाले. मात्र येथे रोजगाराभिमूख उपाययोजनांचा अभाव सतत जाणवत आहे. एकेकाळी तालुक्यातील ग्राहकांनी भरगच्च सजलेली बाजारपेठ आज ओस पडली आहे. आजूबाजूच्या खेडेगावातून नागरिक बाभुळगावात येण्याऐवजी लगतच्या यवतमाळ, धामणगाव, पुलगाव अश्या शहरांमध्ये खरेदीसाठी जात आहेत. यासाठी बाभुळगाव शहराला महत्त्वाच्या असलेल्या विकासकामांचा अभाव कारणीभूत ठरत आहे. या शहराला जोडणारा सावंगी मांग येथे बेंबळा नदिवर पूलाचे बांधकाम करावे, शहरात तालुकास्तरीय अद्ययावत क्रीडा संकुल व्हावे अशी येथील रहिवाश्यांची अनेक वर्षाची मागणी आहे. नगर पंचायतमधील आढावा बैठकीच्या निमित्ताने स्थानिक काँग्रेस नगरसेवक, बाभुळगाव प्रेस क्लबच्या वतीने पालकमंत्री ना. संजय राठोड यांना विकास कामांना सहकार्य करण्यासाठी निवेदने देण्यात आली. आतातरी बाभूळगाव शहराच्या दुर्लक्षित प्रश्नांकडे पालकमंत्र्यानी लक्ष द्यावे, अशी आशा जनता व्यक्त करीत आहे.
बेंबळा नदिपात्रावर मांगसावंगी येथे पूल बांधल्यास त्यापलीकडील सुमारे 20-25 गावांतील नागरिकांना खरेदी-विक्रीसाठी बाभुळगाव शहरात येणे सोयीस्कर जाईल. आजच्या घडीला या गावातील नागरिक बसस्थानक चौकातून बाभुळगाव शहरात येत आहेत. मात्र त्यासाठी त्यांना आगावू दोन किमी अंतर पार करावे लागते. आज रस्त्यांची कामे झाल्याने नागरिक शहरात येण्याऐवजी यवतमाळ, धामणगाव, पुलगाव आदि ठिकाणी जाणे पसंत करीत आहेत. त्याचा थेट फटका बाभुळगावच्या बाजारपेठेला बसला आहे. त्यामुळे मांगसावंगी येथे बेंबळा नदिवर पूल बांधल्यास शहराशी सरळ-सरळ संपर्क होईल, असे निवेदन नगर पंचायतचे काँग्रेसचे नेते तथा उपनराध्यक्ष श्याम जगताप, नगर सेवक शेख कादर, अक्षय राऊत, रेणुका सोयाम, मंजुश्री नंदुरकर यांनी दिले. तसेच याच संबंधीचे निवेदन बाभुळगाव प्रेस क्लच्यावतीने अध्यक्ष आरीफ अली, उपाध्यक्ष प्रविण लांजेकर, कार्यकारी अध्यक्ष शहेजाद शेख, राजु नवाडे, विक्रम ब-हाणपुरे, रविंद्र काळे यांनी सुद्धा दिले.
बाभूळगाव तालुक्यामध्ये होतकरू खेळाडूंची संख्या बरीच मोठी आहे. परंतु क्रीडांगणाच्या अभावी त्यांचे कलागुणांचा विकास त्यांना करता आला नाही. त्यामुळे खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळाला नाही. बाभूळगाव तालुक्याच्या ठिकाणी मोठे व अद्ययावत असे क्रीडासंकुल निर्माण करावे, या मागणीचे निवेदन नगरसेवक अक्षय राऊत यांच्या वतीने देण्यात आले. शहराच्या विकासासाठी, शहरात रोजगार निर्मिती व्हावी, येथील बाजारपेठ समृद्ध व्हावी यासाठी पालकमंत्र्याना यावेळी अक्षरश: साकडे घालण्यात आले. आता बाभुळगाव शहराच्या सर्वांगिण विकासासाठी पालकमंत्री ना. संजय राठोड काय उपाययोजना करतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.



