बाभूळगाव शहरामध्ये वानरांचा उच्छाद .
वन विभागाने त्यांना पकडून नेऊन जंगलात सोडून देण्याची मागणी.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा। बाभुळगाव
बाभूळगाव शहरातील काही भागांमध्ये वानरांनी उच्छाद मांडला असून वन विभागा कडून लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकां कडून केली जात आहे.सदर वानरांचे टोळके काही लोकांच्या मागे सुद्धा लागत असल्याने नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वन विभागाने वानरांना पकडून जंगला मध्ये सोडून द्यावे अशी मागणी आता नागरिकां मधून पुढे आली आहे.
35 ते 40 वानरांचा असलेला हा कळप आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसह ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीवरून पंचायत समितीच्या इमारतीवर उड्या मारतात,तिथल्या वाहनांवर उड्या मारतात यानंतर शिवाजी चौकात येऊन वाहनांवर उड्या मारत असल्याने साईड ग्लास व काचाचे नुकसान होते.टीन पत्र्याच्या घरावर उड्या मारत असल्याने त्याचे नुकसान होते.स्लॅब वर धान्य वाळायला टाकले तर त्याच्यावर सदर कळप ताव मारतो. या वेळी त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांच्या अंगावर धावून जातात.लहान मुलांच्याही मागे लागतात. कुत्रे आपल्या संपूर्ण ताकदीनिशी त्यांचा पाठलाग करतात मात्र ते एका घरावरून दुसऱ्या घरावर उड्या मारत फिरत असल्याने जमिनीवर असलेल्या कुत्र्यांचे काहीच चालत नाही.एकंदरीत या वानरांच्या उच्छादामुळे नागरिक त्रस्त झाले असून हा प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे.अलीकडे त्यात अचानक वाढ झाली असून वानरांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. आता ते कोणालाही न घाबरता घरावर, फळांच्या झाडावर उड्या मारतात व नुकसान करतात. दररोजच्या या त्रासाला नागरिक आता वैतागले असून वन विभागाने या वानरांना पकडून नेऊन जंगलात सोडून द्यावे अशी मागणी नागरिकां मधून पुढे आली आहे.