बारदाना अभावी रखडली सोयाबीनची खरेदी
बाभूळगाव बाजार समितीचे यवतमाळ जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना पत्र
बाभूळगाव | प्रतिनिधी:-
शासनाने नाफेड अंतर्गत हमीभावात सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. मात्र बाभूळगाव बाजार समितीमध्ये बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी बंद ठेवण्यात आली. शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत खरेदी करण्याकरिता नाफेडमार्फत देण्यात येणारा बारदाना उपलब्ध करून देण्यात यावा किंवा नाफेडकडे उपलब्ध नसल्यास बाजार समिती स्वतः त्याच प्रतीचा किंवा त्यापेक्षा चांगल्या प्रतीचा बारदाना खरेदी करण्यास तयार आहे. याकरिता परवानगी देण्यात यावी, असे पत्र बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती राजेंद्र पांडे, सचिव विलास गायकवाड यांनी शनिवारी (दि.४) यवतमाळ येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांना दिले आहे.
बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नाफेड सोयाबीन खरेदीकरिता २४१० अर्ज नोंदणी करिता प्राप्त झाले असून, त्यापैकी १९०४ अर्ज दि. ३ पर्यंत ऑनलाईन झालेले आहे. शेतकऱ्यांनी बाजार भाव वाढीची प्रतीक्षा केली असून, प्रत्यक्षात भाव वाढ न झाल्यामुळे शेवटच्या टप्प्यात नाफेडकरिता भरपूर अर्ज प्राप्त झालेले आहे. त्यापैकी १६०७ शेतकऱ्याचे शेडूलिंग झाले असून, ३८७७.५ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. प्रत्यक्षात बाकी ८०३ प्राप्त अर्जांपैकी या शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी करायची असून बारदाना अभावी खरेदी रखडलेली आहे. त्याकरिता मार्केटिंग अधिकारी यांचेशी पत्रव्यवहार व वारंवार तोंडी माहिती देण्यात आलेली आहे. परंतु, वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला असता मार्केटिंग कार्यालय व कंपनीकडे बारदाना उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत खरेदी करण्याकरिता नाफेड मार्फत देण्यात येणारा वारदाना उपलब्ध करून द्यावा किंवा उपलब्ध नसल्यास बाजार समिती स्वतः त्याच प्रतीचा किवा त्यापेक्षा चांगल्या प्रतीचा बारदाना खरेदी करण्यास तयार आहे. व त्यासाठी बारदाना खरेदी करण्याकरिता परवानगी देण्यात याव, अशी मागणी पत्राद्वारे बाभूळगाव बाजार समितीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचेकडे केली आहे.