भाजपा उमेदवार डाॅ. उईकेंच्या नामांकनासाठी उसळला जनसागर
– लाडक्या बहिनींनी ओवाळून केले औक्षवण–
- ७७- राळेगाव विधानसभा मतदार संघ
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | समीर शिंदे | यवतमाळ :
राळेगाव मतदार संघासाठी दि. 24 आॅक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार डाॅ. अशोक रामाजी उईके यांनी दुपारी 2 वाजताच्या सुमारास नामांकन दाखल केले. यावेळी राळेगाव विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विशाल खत्री यांनी नामांकन अर्ज स्वीकारला. अर्ज दाखल करताना डाॅ. उईके यांचे सोबत माजी खासदार रामदास तडस, प्रल्हाद पटेल, ग्राम विकास मंत्री मध्य प्रदेश, विधानसभा प्रमुख सतीश मानलवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोरडे उपस्थित होते.
सर्व प्रथम राळेगाव शहरातील भाऊसाहेब कोल्हे सभागृहात महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांना डाॅ. उईके यांनी संबोधीत केले. यावेळी महिलांनी त्यांना ओवाळून औक्षवण केले. व्यासपीठावर जेष्ठनेते अण्णासाहेब पारवेकर, माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, अॅड. प्रफुल चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोरडे, राजेंद्र डांगे, राळेगाव विधानसभा प्रमुख सतीश मानलवार, समन्वयक प्रकाश भुमकाळे, हेमंत ठाकरे, बाभूळगाव तालुकाध्यक्ष नितीन परडखे, राष्ट्रवादी बाभूळगाव तालुकाध्यक्ष रमेश मोते यांचे सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अण्णासाहेब पारवेकर यांनी सांगितले की, राळेगाव मतदार संघासाठी डाॅ. उईके यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी विकासकामांसाठी सरकारकडून निधी खेचून आणला. त्यामुळे मतदार संघाच्या विकासासाठी व त्यांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. माजी खासदार राजाभाऊ ठाकरे यांनी सांगितले की, यावेळी राळेगाव मतदार संघातून केवळ आमदार म्हणून नाही तर थेट मंत्रीच तुम्हाला निवडून द्यावयाचा आहे. गतवेळेस पेक्षा अधिक मताधिक्य घेवून डाॅ. उईके निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सभेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने लावलेली उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. राळेगाव शहरातून ढोल ताशाच्या गजरात, पारंपारिक नृत्य सादर करीत भव्य रॅली काढण्यात आली. नामांकन दाखल करण्यासाठी मान्यवर व कार्यकर्त्यांसह उमेदवार डाॅ. उईके उपविभागीय कार्यालयात पोहचले. यावेळी राळेगाव, कळंब, बाभूळगाव तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करून नामांकन दाखल करण्यात आल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. संपुर्ण राळेगाव शहर भगवामय करण्यात आले होते. या शक्तीप्रदर्शनामुळे विरोधकांना जास्त मेहनत करावी लागणार आहे, असे दिसून येते.