
भारताच्या इतिहासातील दुर्लक्षलेली गांधी – आंबेडकर प्रथम भेट…..
राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन बेळगाव (कर्नाटक) – १९२४
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा
राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कर्नाटकातील बेळगाव येथे दि. २३ डिसेंबर ते २७ डिसेंबर १९२४ या कालावधीत विजय नगराला लागून असलेल्या टीळक नगरात आयोजित केले होते. या राष्ट्रीय अधिवेशनाच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली होती.त्यांच्यासोबत देशबंधू -दास, पंडित नेहरू, मोतीलाल नेहरू, कस्तुरबा, राजगोपालाचारी, मौलाना हसरत अली, मौलाना शौकत अली, वल्लभभाई पटेल,सरोजीनी नायडू असे बरेच काँग्रेसच्या उच्च पातळीवरील पदाधिकारी उपस्थित राहिलेले होते. कारण ते राष्ट्रीय अधिवेशन होते.त्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसच्या खजिनदार व प्रधान कार्यवाहच्या कार्यासंबंधी, राष्ट्रीय कामाकरता मोबदला घेण्याच्या धोरणासंबंधी, दारु व अफूच्या व्यापाराला विरोध करण्यासंबंधी,वैतनिक राष्ट्रीय सेवा कार्यासंबंधी जशी चर्चा होणार होती, तसे, राष्ट्रीय शिक्षण संस्था वाचवण्यासंबंधी, कलकत्ता कराराच्या अनुषंगाने,बेळगाव काँग्रेस मधील सरोजीनी नायडू यांच्या सेवा कार्यासंबंधी, वैतनिक राष्ट्रीय सेवा कार्यासंबंधी असे बरेच ठराव करण्याच्या अनुषंगानेही येथे चर्चा करण्यात येणार होती.
हे सारे खरे असले तरी बेळगावच्या या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाच्या संबंधाने काही ठराव करण्यात येणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वत्र केल्यामुळे कोल्हापूर -सांगली बरोबरच चिकोडी, रायबाग,नवन्याळ, कोथळी,कागवाड,निपाणी, कारदगा सदलगा, हुबळी,धारवाड अशा असंख्य खेडोपाड्यातून पसरलेला अस्पृश्यवर्गही काँग्रेस अधिवेशनात एकवटला होता.नुकतीच म्हणजे अवघे चार महिन्यापूर्वी दि.२० जुलै १९२४ रोजी, “बहिष्कृत हितकारणी सभा” या संस्थेची निर्मिती केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या अधिवेशनात दि.२६ तारखेला जातीने उपस्थित राहीले होते. कारण,”अस्पृश्यांचा उद्धार” या एकमेव उद्दिष्टापायी स्थापन झालेल्या या संस्थेचे ते सर्वेसर्वा होते. दि.२६ तारखेला अधिवेशनात पोहचलेल्या डॉ.आंबेडकरांनी मागील तीन दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये अस्पृश्यांच्या संबंधी काही चर्चा झाली का, याची संयोजक मंडळीकडे चौकशी केली.मात्र, त्यांची निराशा झाली. मागील तीन दिवसांमध्ये अस्पृश्यता निर्मूलनाच्या संबंधाने तेथे कोणतीच चर्चा झालेली नव्हती. मग त्यांच्या लक्षात आले की काँग्रेसला मुस्लिम,शीख लोकांच्या बरोबरच अस्पृश्य लोकही काँग्रेसच्या बरोबर आहेत हे दाखवायचे असावे.असो..त्यानी हातातील डायरी उघडली. त्या डायरीतील पानावर त्यांनी मजकूर लिहिला. आपल्याला या अधिवेशनात अस्पृश्यता निर्मूलनाच्या संबंधाने काही एक मत सुचवायचे आहे,परवानगी द्यावी ,अशा आशयाचा त्यांनी त्यात मजकूर लिहिला.त्यानी ती चिठ्ठी स्टेजवरील गांधींजींना मिळेल अशी संयोजकाकडे तजवीज केली. गांधीजींनी हातात पडलेली चिठ्ठी वाचली.गांधीजींनी संयोजकास विचारताच संयोजकाने गर्दीतील खुर्चीत डॉ.आंबेडकर बसल्याचे त्यांना दाखवले. संयोजक निघून गेला. तासावर तास निघून जात होते ,अनेक भाषणे आणि अनेक ठराव होऊन जात होते ,तरी त्या दिवशी देखील अस्पृश्यांच्या संबंधाने तेथे कोणतीच चर्चा झाली नाही. सायंकाळ होवू लागली.दिवसभर अधिवेशनामध्ये ताटकळत बसून राहिलेले डॉ.आंबेडकर कमालीचे बेचैन झाले. ते तडक काँग्रेसच्या अधिवेशनातून बाहेर पडले.काँग्रेसने विशेषता; गांधींनी आपल्याला पाहुनही , आपणाला बेदखल केले ही गोष्ट त्यांच्या मनाला जखम करत होती. गांधी स्वतःला काय समजतात. ते बॅरिस्टर असले म्हणून काय झाले.आम्ही सुद्धा बॅरिस्टरच आहोत. अस्पृश्य लोक आमची मक्तेदारी आहे, त्यांना आम्ही आमचेच म्हणून गृहीत धरू, असे जर कोणी स्वतःला समजत असेल तर त्याचे आम्ही मुळीच ऐकणार नाही. विनंती करूनही अस्पृश्यांच्या प्रश्नावर एखाद्या सुशिक्षित अस्पृश्याला जर बोलूच देत नसतील तर हे कोण लागून गेले. असे रागाने लाले लाल करणारे प्रश्न त्यांच्या मनात धडका मारत होते.
गेले तीन दिवस अधिवेशनात बसून राहिलेल्या देवराय इंगळें आणि त्यांच्या अस्पृश्य सहकाऱ्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. देवदासी प्रथा निर्मूलनाच्या नाटकानी बेळगाव जिल्ह्याच्या सर्वदूर भागात त्यावेळी मोठ्या प्रसिद्धीच्या झोतात ते आलेले होते. ते तात्काळ डॉ.आंबेडकरांच्या जवळ आले. दोघांची भेट राजर्षी शाहू महाराज यांनी माणगाव येथे घेतलेल्या बहिष्कृतांच्या पहिल्या परिषदेमध्ये झाली होती. दोघेही बोलत बोलत काळया आमराईच्या मैदानावर आले. देवराय यांनी आपल्या सोबतच्या दोघा- तिघांना डॉ.आंबेडकरांच्या जवळ उभा केले.काहींना समाजात पाठविले आणि त्यातील काही साथीदारासह ते पुन्हा अधिवेशनामध्ये गेले. त्यांनी अधिवेशनामध्ये बसलेल्या आपल्या बांधवांत फेरफटका मारला आणि थोड्याच वेळात डॉ.आंबेडकर उभा राहिलेल्या ठिकाणी बघता बघता दीड – दोन हजाराची गर्दी जमा झाली. इराप्पा मेत्री, देवाप्पा चवगले , रामा घाडगे, खाडयाच दाम्पत्य, आंदु तुपे,बसवंत हलगेनवर, फकीराप्पा देवरमनी,सटवाजी कांबळे ,देवाप्पा कांबळे, हरसिंह धामूने, परसराम ढोर, मोहनसिंग धामूने या महार,मांग, ढोर, चांभार मंडळींनी देवरायांचा निरोप ऐकताच आपली चवाट गल्ली, जुन्या कार्पोरेशन जवळची काकती गल्ली, मांगवाडा, कंगराळ गल्ली इत्यादी ठिकाणाहून आपल्या साऱ्या मंडळींना एकत्र केले.आता मात्र डॉ.आंबेडकर यांना आपल्या अस्पृश्य जनतेसाठी कोणता ना कोणता तरी संदेश देणे अपेक्षित होते.त्याशिवाय गोरगरीब लोकांना परिवर्तनाची दिशा मिळणे शक्य नव्हते. काँग्रेसची भली स्वातंत्र्यासाठीची चळवळ असेल जरुर परंतु, आपली मात्र आत्मसन्मानाची चळवळ आहे, अशी धारणा डॉ. आंबेडकर यांची बनली होती. किमान हाच विचार जरी आपण आपल्या बांधवांना सांगीतला ,तरी किमान आपल्या बांधवांना आपण चार शब्द सांगीतल्याचे सार्थक होईल ,या हेतूने डॉ.आंबेडकर बोलायला उभा राहिले. त्यानी काँग्रेसला खडे बोल सुनावताना काँग्रेस हा दलितांचा, अस्पृश्यांचा पक्ष होऊच शकत नसल्यामुळे आम्हाला त्या पक्षाशी काहीही घेणे -देणे नाही,असे त्यांनी आपल्या बांधवांना मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले.काँग्रेसने अस्पृश्यांना ग्रहीत धरून आपले पुढे जाण्याचे जे धोरण सुरू ठेवले आहे,ते पुढे- मागे त्यांना अडचणीचेही ठरू शकते, असा टोलाही त्यांनी आपल्या भाषणामधून काँग्रेसला लगावला .आपली अस्मिता काय, आपली धोरणे कोणती , आपली एकी किती गरजेची आहे, या अनुषंगाने तब्बल अर्धा – पाऊन तास त्यानी भाषण केले. भाषण संपताच उपस्थित अस्पृश्य बांधवांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत आपल्या नेत्याचा गौरव केला.आणि आपला मार्गदर्शक म्हणून डॉ.आंबेडकर या उच्च विद्या विभूषिताचा त्यांनी जाहीरपणे स्वीकार केला.
त्या साऱ्यानी येथून पुढे आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनाने पुढे जाण्याचे ठरवले आणि सभा बरखास्त झाली. मात्र ,काँग्रेसच्या विरोधात समांतर चाललेली ही कोणाची सभा होती हे पाहण्यासाठी पोलिसांनी सभेच्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. कारण , ही सभा अगदी अनपेक्षितपणे पार पडलेली होती. बघत राहण्यासारखे दुसरे काहीच त्यांना करता येण्यासारखे नव्हते. डॉ.आंबेडकर जेव्हा परतीच्या प्रवासाला लागले तेव्हा देवरायानी पुन्हा एकदा डॉ. आंबेडकर यांना बहिष्कृतांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण निपाणी सारख्या शहराच्या ठिकाणी जरूर यावे, असे आग्रहपूर्वक विणविले. देवरायानी अल्पावधीत घडवून आणलेल्या या घडामोडीमुळे डॉ.आंबेडकर त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर बेहद्द खुश झाले होते.या खुशीतच त्यानी, आपण निपाणीला निश्चित येऊ आणि आपल्या बांधवांसाठी चांगले काम करू,असा त्या साऱ्यांना त्यानी आत्मविश्वास दिला. त्यांच्या या घणाघाती भाषणाने अस्पृश्यांत मोठे चैतन्य पसरले.त्यांची हिम्मत वाढली, त्यांच्यात मोठे धैर्य संचारले. अंगात हत्तीचं बळ संचारल्यासारखी भावना झालेल्या या अस्पृश्य बांधवांनी गांधींच्या अधिवेशनाकडे सपशेल पाठ फिरवली आणि तडक आपल्या घराचा रस्ता पकडला.कारण,आज त्यांना त्यांचा पुढारी मिळाला होता.
मात्र कोणत्या ना कोणत्या मार्गाने गांधीजींच्या कानावर डॉ.आंबेडकर यांनी काळया आमराईत काल रात्री घेतलेल्या काँग्रेस विरोधी सभेचा वृत्तांत गेलाच… ! नाही म्हटले तरी, कालच्या सभेबद्दल अधिवेशनाच्या ठिकाणी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. उत्सुकता लागून होती की,गांधीजी यामधून कोणता मार्ग काढतात. साऱ्यांच्या मनात एक अनामिक अस्वस्थता पसरलेली होती .बऱ्याच वेळ मनाशी हितगुज केल्यानंतर गांधीजी एका निर्णयापर्यंत आले. आपल्या शीरावर भारतातील काँग्रेसचा मुकुट आहे याची त्यांना जाणीव झालीअसावी .अधिवेशनाच्या सांगता समारंभाचे भाषण झाल्यानंतर अधिवेशनाची सांगता होणार होती.डाॅ. आंबेडकर हे काँग्रेसचे प्रतिनिधी नव्हते.मात्र, येथे गांधीजी एका वेगळ्याच पवित्र्यात दिसले.त्यांनी अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या प्रतिनिधी समोर, तेथील नेते – पुढाऱी, आणि जनतेसमोर सर्वांना आचंबित करणारी भूमिका मांडली.ते म्हणाले,” एक अस्पृश्य बंधू जो प्रतिनिधी नाही, त्याला चार शब्द बोलायचे आहेत अशी एक चिठ्ठी माझ्याकडे आली होती. तो जरी प्रतिनिधी नसला तरी तो अस्पृश्य असल्यामुळे त्याला बोलायला परवानगी दिली तर बरे होईल, असे मला वाटले.पण मी विसरलो..त्याबद्दलचे प्रायश्चित म्हणजे त्याची माफी मागणे.!” गांधींच्या या खुलाशाने साऱ्या अधिवेशनात संथ शांतता पसरली. मात्र गांधीजींचा हा माफीनामा ऐकण्यासाठी डॉ.आंबेडकर तेथे उपस्थित राहिलेले नव्हते ;तर ते, आदल्या दिवशीच मुंबईला परत पोहोचले होते. आणि गांधीजींच्या या साऱ्या गोष्टींना आता काहीच अर्थ राहिला नव्हता .ते काहीही असले तरी गांधीजींच्या या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाने कर्नाटकातील अस्पृश्यांना मात्र डॉ.आंबेडकरासारखा एक उच्च,विद्या विभूषित महान नेता मिळालेला होता, हे नाकारण्यात आता कोणताच मार्ग शिल्लक राहीला नव्हता !
डॉ.संभाजी बिरांजे,
हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती या महाराष्ट्र शासनाच्या समितीचे सदस्य असून
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे येथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
(हि माहिती डॉ. संभाजी बिरांजे यांच्या वाल वरून साभार घेतली आहे….)