भैय्यापूर रेतीघाटावरून धावणा-या वाहनांमुळे रस्त्यांची दुरावस्था
शासकीय रेतीडेपो सुरू न झाल्याने तस्करांची चांदी ?
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभूळगाव
तालुक्यातील मौल्यवान असलेल्या रेती साठ्याच्या वापरासाठी शासकीय रेती डेपोची निर्मीती करण्यात आली होती. मात्र यावर्षी अद्यापही रेतीडेपो सुरू न झाल्याने गरजु लोकांना रेती मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे रेती तस्करांची चांदीच झाली असून त्यांनी रेतीघाटांना रिकामे करण्यास सुरूवात केली आहे. नांदेसावंगी गावाजवळ असलेल्या बेंबळा नदिपात्रातील भैय्यापूर, नागरगाव रेतीघाटातून रेती भरून निघणारे ट्रॅक्टर भरधाव वेगाने धावत आहेत. या वाहनांमुळे गावातील रस्त्यांची चाळणी झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता असे चित्र निर्माण झाले आहे. कोट्यावधी रूपयांच्या मौल्यवान रेतीची चोरी होत असताना प्रशासन गप्प का असा सवाल जनता विचारत आहे.
भैय्यापूर,नागरगाव रेतीघाटातून दररोज विस ते पंचेविस विना क्रमांकाचे ट्रॅक्टर रेती भरून नांदेसावंगी गावातून धावताना दिसून येतात. ही वाहने दिवसातून चार चार वेळा येरझारा करीत आहेत. शासकीय यंत्रणेला चकमा देण्यासाठी मुद्दाम ही वाहने म्हणून गावातून टाकण्यात येतात. त्यामुळे गावातील रस्त्यांना तडे गेले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रेतीघाटावरून कॅनलमार्गे वाहने नेता येत असली तरी चोरवाट म्हणून गावातील रस्त्यांचा वापर केला जात आहे, असा आरोप गावकरी करीत आहेत. रेतीघाटाच्या वाटेवरील शेतक-यांना आर्थिक आमिष दाखवून त्यांच्या शेतापूरत्या रस्त्याची मुरूम, रोडा टाकून थातूर मातूर डागडुजी केली जाते. कुणी ऐकले नाही तर त्याला दमदाटी सुद्धा रेती तस्कर करीत असल्याची शेतक-यांची ओरड आहे. या रेतीतस्करांच्या अरेरावीमुळे भयभित झालेले शेतकरी, गावकरी प्रशासनाकडे तक्रार करण्यास धजावत नाहीत, असे दिसून आले आहे.
तालुक्यातील रेतीघाटांचा लिलाव न झाल्याने मागील वर्षी रेती तस्करांनी उधम घातला होता. यात रेती उपस्यावरून आपसी वादविवाद रेती घाटांवर पहायला मिळाले होते. त्याच प्रमाणे शासकीय अधिका-यांशी असभ्य वर्तवणूकीच्या घटना सुद्धा घडल्या होत्या. यावर्षी सुद्धा सप्टेंबर महिन्यापासून रेतीचा अवैध उपसा व वाहतूकीच्या गोरखधंद्याने जोर पकडला असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाला रेतीतस्करांनी अक्षरश: जेरीस आणून राजरोसपणे रेतीचा उपसा व वाहतूक करण्यास सुरूवात केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
महसूल व खनिकर्म विभागाने घेतले झोपेचे सोंग ?
बाभूळगाव तालुक्यातील रेतीसाठ्यांचा चोरट्यांनी अक्षरश: फडशा पाडला आहे. रेतीघाट हर्रास झालेले नसताना सुद्धा तालुक्यातील अनेक बांधकामावर मुबलक प्रमाणात व ताजी रेती टाकण्यात येत आहे. यावरून तालुक्यातील रेती उपसा व वाहतुक होत आहे, ही बाब सुर्य प्रकषाइतकी स्वच्छ आहे. मात्र याकडे खनिकर्म विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. महसुल विभागाने सुद्धा इतक्यात कुठलिही कार्यवाही केल्याचे निदर्शनास आले नाही. त्यामुळे या दोन्ही विभागांनी झोपेचे सोंग घेतले की काय? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेतून विचारल्या जात आहे.
प्रशासनाने संपुर्ण तालुक्यातून रेती तस्करी हद्दपार करावी …रमेश मोते, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, बाभूळगाव
बाभूळगाव तालुक्याला अमुल्य असा रेतीसाठा बेंबळा व वर्धा नद्यांमुळे प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी रेती तस्करीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या प्रकारांमुळे गावागावातील नागरिक त्रस्त झालेले आहेत. रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक प्रशासन हतबल झालेले दिसून येते. आता याप्रकरणी वरीष्ठांनीच लक्ष देवून तालुक्यातून रेती तस्करी हद्दपार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
—- रेती तस्करांची अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रार केली….. संजय पचकटे, पोलीस पाटील नांदेसावंगी
अवैध रेती उपसा व वाहतुकीसंदर्भात वरीष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. रेतीचे अवैध ट्रॅक्टरांवर सुद्धा कार्यवाही करण्यात आली आहे. गावातून ट्रॅक्टर नेऊ नका म्हणून अडवणूक केली. मात्र तरीही रेती तस्कर मुजोरी करून गावातून दिवस रात्र वाहतुक करीत आहेत. यामुळे गावात एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.