महिलेच्या पर्समधून एक लाखाची रोकड केली लंपास
बाभूळगाव बसस्थानकावरील घटना
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा |बाभूळगाव :-
एस टी बस मध्ये चढत असताना महिलेल्या पर्समधून चोरट्याने तब्बल एक लाख रूपयांची रोकड लंपास केली. ही घटना बाभूळगाव बसस्थानकावर दाभा-पहूर गाडीमध्ये चढताना दि. 18 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजताचे सुमारास घडली. यातील पिडीत महिलेचे नाव लिला मारोतराव वाट, रा. दाभा असे असून त्यांनी या प्रकरणी बाभूळगाव पोलीसांत फिर्याद नोंदविली.
प्राप्त माहिती नूसार, दाभा येथील आदर्श महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनिता रामेश्वर बानते व सचिव लिला मारोतराव वाट ह्या महिला बचत गटासाठी मिळालेले कर्ज घेण्यासाठी बाभूळगाव येथील इंडियन बँक ( अहालाबाद बँक) शाखेत आल्या होत्या. त्यांना बँकेतून कर्जापोटी 100 रूपयांच्या नोटांचे 10 बंडल एकत्र सुतळीने गुंडाळून असलेले व 500 रू.च्या नोटांचे चार बंडल असे तीन लाख रूपये नगदी स्वरूपात देण्यात आले होते. ही सर्व रक्कम सचिव लिला वाट यांच्या पर्समध्ये ठेवून दोनही महिला दुपारी चार वाजताचे सुमारास बाभूळगाव बसस्थानकावर आल्या. त्यावेळी तेथे बाभूळगाव दाभा नेर बस लागलेली असल्याने त्या बसमध्ये चढण्यासाठी गेल्या. बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थी, प्रवाशांची मोठी गर्दी होती. बसमध्ये चढल्यानंतर लिला वाट यांनी तिकीटासाठी पर्समधून पैसे काढण्यासाठी हात घातला असता त्यांना पर्सची चेन उघडी असल्याचे निदर्शनात आले. त्यांनी आत तपासले असता 100च्या नोटांचे असलेले सुमारे एक लाख रूपयाचे बंडल आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी बसखाली उतरून पुन्हा पर्स तपासली असता पैसे चोरीला गेल्याबाबत खात्री झाल्याने आराडाओरड केली. दोनही महिलांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठून चोरीची फिर्याद नोंदविली. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास बाभूळगाव पोलीस करीत आहे.
चोरीच्या घटना रोखण्यासाठी बसस्थानकावर सीसीटिव्हीची गरज
तालुक्याचे ठिकाण असल्याने बाभूळगाव बसस्थानकावर ब-याच मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. त्यातून आठवडा-महिन्यातून एखादी चोरीची घटना घडल्याचे ऐकावयास येते. या ठिकाणी प्रवासी विद्यार्थ्यांची संख्याही भरपूर असल्याने चिडीमारी सारख्या घटना घडतात. त्यामुळे या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमरे लावण्याची मागणी जोर धरत आहे. त्याच प्र्रमाणे पोलीस विभागाने या ठिकाणी कायम स्वरूपी पोलीस कर्मचारी नेमावा किंवा पोलीस चौकी द्यावी अशी मागणी प्रवाशी, विद्यार्थी करीत आहेत.