
युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा ठाकरेंनी दिला राजीनामा
— इच्छुकांसाठी वाट मोकळी केल्याची चर्चा—
दिव्यदृष्टी डिजिटल न्यूज । विशेष प्रतिनिधी
गेल्या आठ वर्षांपासून युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाची धूरा समर्थपणे सांभाळणारे कृष्णा सोपानराव ठाकरे यांनी आपल्या पदाचा आज दि. 23 रोजी तडकाफडकी राजीनामा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांचेकडे पाठविला. त्याच प्रमाणे त्यांनी काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके तसेच युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे यांनाही पाठविला आहे. तालुका स्तरावर होत असलेल्या घडामोडी पाहता इच्छुकांसाठी वाट मोकळी करून देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
कृष्णा ठाकरे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी पक्ष पातळीवर अनेक आंदोलने केली. एक उमदा व पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. युवक कॉंग्रेसच्या नियमानुसार 35 वर्षाआतील सदस्यांनी तालुकाध्यक्ष पदावर राहावे यासाठी त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनामापत्रात त्यांचे वय तसेच कौटुंबिक कारण सांगितले आहे. असे असले तरी राजीनामा देण्यामागे काही इतर राजकीय कारणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. युवक काँग्रेसच्या नव्या तालुकाध्यक्ष पदासाठी पक्षातील 35 वर्षांआतील सदस्यांसाठी मोहिम राबविण्याचे युवक कॉंग्रेसने ठरविले आहे. त्यासाठी इच्छुक सदस्यांनी 24 व 25 मार्च या कालावधीत आपला बायोडाटा तसेच अर्ज युवक कांग्रेस राळेगाव विधानसभा अध्यक्ष विपुल बोदडे यांचेकडे सादर करावयाचा आहे. युवक कॉंग्रेस पदाधिकारी निवड नियमानुसार या पदासाठी इच्छुक व्यक्तीचे वय 35 वर्षांपेक्षा कमी असावे तसेच तो काँग्रेस पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता असावा. तालुक्यातील इच्छुकांनी आवेदन सादर करण्याचे आवाहन विपुल बोदडे यांनी केले आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून नविन तालुकाध्यक्षांसाठी हालचालींना वेग आला आहे.