राळेगाव मतदारसंघात अशोक मेश्राम यांची दबंग ‘एंट्री’ !
मनसेच्या वतीने दाखल करणार उमेदवारी
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव:
समाजसेवेच्या माध्यमातून गोरगरीबांना आधार देण्याचे कार्य करणारे दबंग समाजसेवक अशोक मेश्राम यांनी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दि. २६ रोजी भेट घेतली. त्यांनी मनसेत अधिकृतरित्या पक्ष प्रवेश केला असून त्यांना राळेगाव मतदार संघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणूकीत राळेगाव मतदार संघात मनसेची ‘एंट्री’ होणार हे निश्चीत झाले आहे. मतदार संघात दरवेळेस भाजपा विरूध्द काँग्रेस अशी थेट लढत होत होती. मात्र आता एका दबंग उमेदवाराने दंड थोपटल्याने निवडणूकीत रंगत वाढणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या समाजसेवक अशोक मेश्राम यांना काँग्रेस श्रेष्ठींकडूनकाहीच ‘रिस्पोंस’ मिळाला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या अशोक मेश्राम यांनी जनतेच्या सेवेसाठी अपक्ष उभे न राहता, गोरगरीबांच्या प्रश्नांना वाचा फोडणा-या मनसेचे सभासदत्व स्विकारले. त्यांनी थेट पक्ष प्रमुख राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांना राळेगाव मतदार संघातील समस्यांबाबत अवगत केले. त्या ठिकाणी आता पर्यंत निवडून आलेल्या आमदारांनी विकासाच्या नावावर फक्त जनतेला निराश केले , त्यामुळे जनता त्यांचेवर नाराज असल्याची माहिती दिली. राज ठाकरे यांनी चर्चा करून अशोक मेश्राम यांचा पक्ष प्रवेश करून घेतला व त्यांना राळेगाव मतदार संघाची मनसेची उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीमुळे अशोक मेश्राम यांच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. दि. 29 रोजी राळेगाव उपविभागीय कार्यालयात नामांकन दाखल करण्यात येणार असल्याचे अशोक मेश्राम यांनी सांगितले. मनसेच्या ‘एंट्री’मुळे राळेगाव मतदार संघात तिहेरी लढत होण्याचे संकेत मिळाले असून निवडणूकीत चांगलीच चुरस निर्माण होणार असल्याचे दिसून येते.