महायुती-महाविकास आघाडीत काट्याची टक्कर?
निवडणूक प्रचारात डाॅ. उईकेंनी घेतली आघाडी
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | समीर शिंदे :-
राळेगाव मतदार संघात निवडणूक प्रचाराने वेग धरला आहे. दिवसागणिक कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा गावागावात पोहचून मतदारांशी संवाद साधत आहेत. यावेळी आपण कुठच मागे पडता कामा नये यासाठी महायुती व महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक मेहनत घेताना दिसून येत आहे. त्यामुळे यावेळी महायुतीचे डाॅ. अशोक उईके व महाविकास आघाडीचे प्रा. वसंत पुरके यांच्यातच खरी काट्याची टक्कर पहावयास मिळणार आहे. सद्यस्थितीत निवडणूक प्रचारात डाॅ. उईकेंनी आघाडी घेतली असून त्यांचे प्रचारकर्ते घरोघरी जावून प्रचार करताना दिसून येत आहे.
महायुतीकडे गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकास कामांचे व महायुतीच्या काळातील योजनेचे व्हीजन आहे. त्याआधी सुद्धा महायुतीच्या काळातील विकास कामांचा लेखा जोखा डाॅ. उईके मांडताना दिसून येत आहेत. त्यामानाने महाविकास आघाडीकडे महागाई, कापूस, सोयाबीनचे भाव, परदेशी आयात यापलीकडे कुठलेही ठोस मुद्दे दिसून येत नाही. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या लाकडी बहिण योजनेच्या धर्तीवर महिलांना तीन हजार रू. देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच आरोग्य विमा हा सद्ध्याच्या पाच लाखावरून पंचेविस लाख करण्याचेही आश्वासन देण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे सद्याच्या सरकारच्याच योजनांना मोठ्या प्रमाणात जाहीर करून महायुतीचीच काॅपी करण्याचा प्रयत्न केल्याचा डाॅ. उइके यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. त्यामुळे महायुतीने केलेल्या विकास कामांचा मोठ्या प्रमाणात वापर करून त्याचे भांडवल करण्यात डाॅ. उईके कितपत यशस्वी होतात, हे पाहण्यासाठी राजकीय जाणकार उत्सुक आहेत.
लोकसभा निवडणूकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकीतही योग्य रित्या नियोजन करण्यात येत असून बारिक सारीक बाबींकडे लक्ष देण्यात येत आहे. सद्यातरी निवडणूक प्रचारात तिस-या उमेदवराची ‘एंट्री’ बाभूळगाव तालुक्यात झालेली नाही. त्यामुळे दोनच उमेदवारांनी प्रत्येक गाव पिंजून काढले असुन एकेका गावात कार्यकर्त्यांच्या दोन ते तिन भेटी झाल्या आहेत. लोकसभेच्या वेळी झालेल्या चूकांची दुरूस्ती करणे, नविन रणनिती आखणे, आगामी येणा-या इतर निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांची वज्रमुठ तयार करणे हे दोनही मोठ्या पक्षांसाठी आवश्यक असल्याने कुणीही मेहनतीत कमी पडताना दिसून येत नाही.