Homeधर्म / समाजसहा महिन्यापासून रखडले राणी अमरावती- सावर रस्त्याचे काम ?

सहा महिन्यापासून रखडले राणी अमरावती- सावर रस्त्याचे काम ?

सहा महिन्यापासून रखडले राणी अमरावती- सावर रस्त्याचे काम ?

कंत्राटदाराच्या वेळकाढू धोरणामुळे नागरिक त्रस्त

बाभूळगाव | प्रतिनिधी |

    बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती जवळ असलेल्या कमळजापूर येथे कमळजा भवानी मातेचे मंदिर असून त्याला पुरातन इतिहास लाभलेला आहे. या देवीची तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून ओळख आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यासह व शेजारच्या अनेक जिल्ह्यातून शेकडो भाविक भक्त येथे नियमित दर्शनासाठी येतात. त्यामुळे या रस्त्याने मोठी वर्दळ पहावयास मिळते. त्यामुळे या परिसरातील गावातील नागरिकांनी लोकप्रतिनिधीकडे तकादा लावल्यानंतर या साठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार या मंदिरासमोरून जाणारा राणीअमरावती, सावर, भिलुक्षा, बोरगाव हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून सहा किमी. लांब व पाच मीटर रुंद असा मंजूर झाला आहे. सदर रस्त्यासाठी शासनाने चार कोटी 39 लाख रुपये एवढा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याची निविदा सहा महिन्यापूर्वी झाली असून कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. हे काम यवतमाळ येथील एका बड्या कंत्राटदाराला मिळालेले आहे. मात्र अजून पर्यंत सदर रस्त्याच्या कामाला सदर कंत्राटदाराने सुरुवात केलेली नाही. यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जाणे येणे करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.  या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  

     या कामाचा तत्काळ कार्यारंभ करून घेण्यासाठी नागरिकांनी शिष्टमंडळ तयार करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांना कामाचे गांभीर्य सांगून विद्यमान कंत्राटदार काम करीत नसल्यास इतरांना कंत्राट देण्याची सुद्धा मागणी केली आहे.  याशिवाय सदर कंत्राटदाराची भेट घेवून काम सुरु करण्याची विनंती केली आहे. कंत्राटदाराने मात्र अनेक कारणे पुढे करीत नागरिकांची विनंती फेटाळल्याचे समजते. कंत्राटदाराच्या वेळकाढू धोरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

भाविकांसाठी रस्त्याचे काम होणे आवश्यक

राणी अमरावती गावाजवळ याच रस्त्याने मिथे निम वाले बाबाची प्रसिद्ध दर्गाह आहे. याठिकाणी सावर, आसेगाव, आलेगाव येथील मुस्लीम भाविकांची श्रद्धा असल्याने ते मोठ्या संख्येने नियमित येतात. त्यांना सावर ते राणी अमरावती हा रस्ता जवळचा व सोयीस्कर पडतो. त्याच प्रमाणे सावर, भिलुक्षा, बोरगाव आदि गावातील नागरिकांना बाभूळगाव बाजारपेठेत येण्यासाठी हाच मार्ग अतिशय उपयुक्त आहे. नेर तालूक्यातील भाविकांना सुद्धा वाई, झोला, सावर मार्गेच यावे लागते. तसेच राणी अमरावती गावात प्राचीन शिव मंदिर, राम मंदिर असून धार्मिक श्रद्धा असलेल्यांसाठी हा मार्ग सोयीचा आहे. त्यामुळे भाविकांसाठी या रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे.

देवस्थानाच्या पर्यटनस्थळाकडे वाटचालीने वाढली वर्दळ

या मंदिराला तीर्थक्षेत्र विकासाचा ‘ब’ दर्जा मिळालेला असल्याने येथे मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा, विकास कामे केली जात आहेत. मंदिराजवळून वाहणाऱ्या उत्तरवाहिनी वेरुळा नदी व गोमुखातून अविरत वाहणारा झरा भाविकांसह पर्यटकांचे आकर्षण ठरलेले आहे. या ठिकाणी असलेल्या सुविधांमुळे विवाहकार्य, धार्मिक कार्य येथे वर्षभर सुरु असतात. छोट्या मोठ्या सभांसाठी येथे सभागृह उपलब्ध आहे. नदीचा परिसर, बगीचा, शांत व अध्यात्मिक वातावरण असलेला हा परिसर विविध धार्मिक संस्थानाने व्यापलेला असल्याने जिल्ह्यातील अनेक गावातून भाविक येथे येतात.

निधी अभावी काम करू शकलो नाही….. रमेश गिरोलकर, कंत्राटदार यवतमाळ

राणी अमरावती ते सावर या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याच्या कामावर निधी उपलब्ध नाही. जवळचा पैसा यात गुंतवू शकत नाही. त्यामुळे अद्याप काम सुरु केले नाही. आता शासनाकडे वाढीव निधीची मागणी करीत आहो. निधी उपलब्ध झाल्यावर काम सुरु होईल.

कामाचा गुंता शासनाने तत्काळ सोडवून काम सुरु करावे…. किशोर हजारे, विश्वस्थ, कमळजाई देवस्थान

मी देवस्थानचा विश्वस्थ असून इथे येणाऱ्या भाविकांना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे या रस्त्याचे काम होणे अनिवार्य आहे. धार्मिक स्थळांशी संबंधित असलेला कामाचा गुंता शासनाने तत्काळ सोडवून काम सुरु करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img