
‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’……… सौ चित्रा सुधाकर काळे (गोतमारे)
महिला दिना निमित्य विशेष लेख….
बाभूळगाव | समीर शिंदे :-
आज मला शाळेतली प्रार्थना आठवली.” रूपे तुझी अनंत नाही तयास अंत परि एक असशी देवा अमुचा प्रणाम घ्यावा .” माझ्या मनात एक विचार शिवून गेला की, स्त्री ला सुद्धा अनेक रूपे आहेत .तिच्या रूपाला सुद्धा अंत नाही . पण ह्या संसारात तिला कुणीच प्रणाम तर सोडा तर मान सुद्धा देत नाही. तरी ती आपली भूमिका मुकाट्याने निभवित असते.
आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. ती स्वतःची जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडते . पण कुठेतरी ती कमजोर पडते. कारण तिचे मन हळवे असते. तिला कुणीही अगाऊ बोलले तर ती सहन करू शकत नाही . म्हणून ती प्रसंग पाहून अबोल असते . पण बाकीच्यांचा गैरसमज असा होतो की ती एक महिला आहे म्हणून तिला काहीच समजत नाही. पण हा त्यांचा चुकीचा गैरसमज असतो. तिला वादविवाद नको असतो.
स्त्री स्त्रीच्याच पोटी जन्म घेते जन्म देणारी तिची आई एक स्त्रीच असते. जी जन्म घेते ती मुलगी एक स्त्री असते. पण जेव्हा ती मुलगी जन्म घेते ती एक लहान गोंडस कन्या असते. जी स्त्री भाग्यवान असते त्याच स्त्रीला कन्यारत्न प्राप्त होत असते . छोटीशी लहानशी बालिका असल्याने त्यांच्या घरात आनंदी वातावरण असते.
लहानशी बालिका मोठी होते तिचे शिक्षण पूर्ण होते . ती स्वतःच्या पायावर उभी राहते किंवा करियर घडविते. एखादा सुव्यवस्थित मुलगा पाहून लग्न करून दिल्या जाते. सासरी आल्यावर तिला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते . पण तरीही ती न डगमगता प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाते, व प्रसंगावधान राखत असते,असे करत अनेक वर्षे निघून जातात .
स्त्री ही माहेरी कुणाची तरी मुलगी असते, कुणाची तरी बहीण असते, आत्या असते, मावशी, नणंद असते.
स्त्री ही सासरी कुणाची तरी पत्नी असते, कुणाची तरी सून असते, कुणाची काकू, कुणाची मामी, कुणाची वहिनी,,कुणाची तरी
मोठी आई, तिच्या मुलाची ती आई असते. ती नातवांची आजी असते
ही नाती निभवता निभवता तिच्या स्वतःच्या जीवनाकडे दुर्लक्ष होते. आणि ती जर नोकरीवर असली तर तिची धांदल विचारूच नका. पण हे सर्व करत असतांना तिची फार काही अपेक्षा नसते ती ज्या व्यक्तीसाठी हे सर्व करत असते, त्याच्या कडून तिला फक्त दोन प्रेमाच्या शब्दाची गरज असते तिला त्याने समजावून घेण्याची गरज असते.
आपल्या जीवनसाथीने आपल्याला समजून घ्यावे अशी तिची अपेक्षा असते. ती जी काही करते ती नळकत आपल्या संसाराला हातभार लावत असते. पण तिचे मन समजून घ्यायला कोणी तयार नसते. ज्या जीवनसाथी साठी ती पूर्णपणे स्वतःला झोकून देते तोच जर बोलतांना त्याचा तोल सुटला तर तिला आपले जीवन पूर्णपणे वाया गेल्यासारखे वाटते व ती स्वतःच्या नशीबाला दोष देत बसते. पण जीवनसाथीने सुद्धा तिच्या भावना जपल्या पाहिजे.
स्त्री च्या रूपातले सर्वात महत्त्वाचे रूप आई . हे रूप निभवितांना तिला तिच्या भावना जपून मुलांना संस्कारी बनविणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. आपला मुलगा संस्कारी बनला तर तो उद्याचा भारताचा सुसंस्कृत नागरिक घडेल . व इथल्या प्रत्येक स्त्रीला
मान मिळेल. व त्या कधीही अपमानित होणार नाही . आज मुलाने आपल्या आईचा मान ठेवला तर तो उद्या आपल्या पत्नीचा मान ठेवेल व तिचा कधीही अपमान करणार नाही.
जगातील नारीशक्ती कमजोर नाही. पण मला असे वाटते की, सर्वांनी जर एकमेकांचा आदर करावयाला हवा की, जेणेकरून सर्वांना सर्वांविषयी मनात आदर निर्माण होईल. नारी कमजोर नाही पण तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून द्यावी . एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला अपमानित करू नये. तिला अपशब्द बोलू नये. कारण ती सुद्धा एक स्री असते तिला सुद्धा स्वतःच्या भावना असतात असतात. स्त्रीने स्त्री बद्दल आदर ठेवावा. तेव्हाच आपल्या देशाकडे कुणीही वाईट नजरेने बघणार नाही. एक स्त्री दुसऱ्या स्त्री चा आदर ठेवेल तिचा अपमान करणार नाही तेव्हाच नारीचा विजय होईल.
जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.
लेख✍️
सौ चित्रा सुधाकर काळे ( गोतमारे ), महमदपूर जि. यवतमाळ.