Homeयवतमाळ.राळेगाव विधानसभेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू.....

.राळेगाव विधानसभेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू…..

राळेगाव विधानसभेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू…..

उमेदवारांच्या सभा, बैठका,ध्वनिक्षेपक द्वारे प्रचारास आला वेग

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभुळगाव :

राळेगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणूक प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. पक्षनिष्ट कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत. हॉटेल, ढाबे, तसेच प्रचार कर्त्यांसाठी खास जेवणावळी सुरू झाल्या आहेत. निवडणुकीची रणधुमाळी  व चर्चांना खऱ्या अर्थाने सुरूवात झाल्याचे पहायला मिळत आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ८ उमेदवार पक्षाच्या बाजूने तर ३ अपक्ष उमेदवार आपापले नशीब आजमावणार आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र महायुतीचे डॉ. प्रा. अशोक ऊईके तर महाविकास आघाडीचे प्रा. वसंतराव पुरके यांच्यातच खरी चुरशीची लढत होणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

   उमेदवारी अर्ज दाखल करताना या दोन्ही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले होते. यावरून यावेळची लढत  ही तुल्यबळ होणार असल्याचे दिसून आले. या शिवाय मनसेने या मतदार संघात  एन्ट्री केली असून प्रचाराच्या पहिल्याच दिवशी दि.५ रोजी राळेगाव  येथे राज ठाकरे यांची दमदार सभा झाली. परंतु मनसेचे अशोक मेश्राम हे मतदार संघासाठी नवखा चेहरा असून ते किती मजल मारतील हे आतातरी सांगता येणे कठीणच आहे. याशिवाय प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉ. अरविंद कुळमेथे, वंचित बहुजन आघडी कडून किरण कुमरे ,गोंडवाणा गणतंत्र पार्टी कडून जीवन कोवे, राष्ट्रीय समाज पार्टी रामदास माहूरे, सन्मान राजकीय पार्टी सुवर्णा  नागोसे,  यांच्या सह अपक्ष उमेदवार उद्धव  टेकाम, बबनराव गेडाम, रमेश किनाके हे सुद्धा आपले नशिब आजमावत आहेत. परंतु यातील किती उमेदवार पाच अंकी मते मिळवतील यावर निवडणूक निकाल अवलंबून राहणार आहे.

            भाजपचे आमदार डॉ. अशोक ऊईके हे प्रचारा दरम्यान मतदार संघात शासकीय योजना व अनेक कोटींची  विकास कामे केल्याचा दावा  प्रचारात करीत आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. वसंत पूरके हे शेतकऱ्यांना शेत मालाला मिळणारा निम्नभाव  व महागाई हा मुद्दा घेऊन प्रचार करताना दिसत आहे. गेले सहा वेळा या मतदार संघात पूरके यांनी निवडणूक लढविली आहे.त्यात दोन पंचवार्षिक मध्ये पराभव पत्करावा लागला. परंतु गेल्या दहा वर्षात त्यांनी या मतदार संघात कार्यकर्ते व मतदारा सोबत सतत संपर्क चालूच ठेवला होता. याचाच आधार घेत महाविकास आघाडी कडून परत महायुतीलां तगडे आव्हान देण्यासाठी त्यांनाच मैदानात उतरवले आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदार संघातून महाविकास आघाडीच्या संजय देशमुखांना लोकसभेत चांगले मतदान मिळाले. त्यावेळी शिवसेना( उ.बा.ठाकरे गट), काँग्रेस व राष्ट्रवादी(श.प.) यांनी आपल्या विभागातून मताधिक्य मिळविण्यात यश मिळविले होते.हिच वज्रमूठ महाविकास आघडीने विधान सभेत कायम राखल्यास लढत अतीशय चुरशीची होणार याबाबत शंकाच नाही. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेचे चित्र थोडे वेगळे आहे. यावेळी सलग दोनदा निवडून आलेले महायुतीचे डॉ. अशोक उईकेचे आव्हान महविकास आघाडीस निश्चितच जड जाणार आहे. उईके यांचा संपर्क सातत्य व कोट्यावधींची विकासकामे तसेच कार्यकर्त्यांची मोठी फळी याशिवाय महायुती सरकारने घेतलेले धडाकेबाज निर्णय व लोकहिताच्या विविध योजना यामुळे जनतेचा वाढलेला विश्वास उईकेच्या बाजूने आहे. याशिवाय इतर पक्षाचे उमेदवार व अपक्ष यांचा फायदा कोणाला आणि कोणाला तोटा होईल यावर दोघांचे विजयाचे गणित अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img