लातूर बाजार समितीचा गैरप्रकार चव्हाट्यावर ?
हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी मनसेने उधळली
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा :- (लातूर) :
खरेदीदारांना हाताशी धरून गेल्या अनेक महिन्यांपासून हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी विक्री करून शेतकऱ्यांना लुटण्याचा लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी भंडाफोड केला. शेतीमाल हमीभावानुसारच खरेदी करा; अन्यथा कृषी उत्पन्न बाजार समिती फोडून टाकू, असा इशारा मनसेने यावेळी दिला. लातूरच्या आडत बाजारात गेल्या अनेक वर्षांपासून पोटलीने खरेदी करून शेतकऱ्यांना सर्रास लुटले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने हे आंदोलन केले.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी भावाने शेतीमाल खरेदी-विक्री करू नये. पोटलीच्या भावाची अनिष्ट प्रथा बंद करावी. तसेच पायली, मातेरं, कडतीच्या नावाखाली होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी या मागण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सौदा बंद पाडण्यात आला. यावेळी बाजार समितीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी यापुढे पोटली, पायली, मातेरं, कडती हे अनिष्ट प्रकार बंद करू असे लेखी पत्र मनसेला दिले. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे, रेणापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुंडे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार, लातूर तालुका संघटक श्रीनिवास काळे, श्रीपाल बस्तापुरे, भागवत कांदे, दत्ता म्हेत्रे, निलेश कुरडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.