* निवडणूक पथक प्रमुखांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा*
विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त पथक प्रमुखांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी – जिल्हाधिकारी अभिनव गोयल
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा :- (हिंगोली) :
हिंगोली जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथक प्रमुखांनी सजग राहून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी २० सप्टेंबर रोजी बैठकीत बोलताना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक पथक प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघाचे सर्व उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व तहसीलदार, पोलीस यंत्रणेचे अधिकारी यांच्यासह सर्व पथक प्रमुख, सहायक पथक प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी एसएसटी, एफएसटी, व्हीएसटी पथके नेमण्यासाठी दूरसंचार नेटवर्कचा विचार करुन ठिकाणे निश्चित करताना ती योग्य जागेवर निवडावीत. कारण त्या ठिकाणची माहिती घेण्यासाठी संवाद साधणे सोयीचे होईल, असे सांगितले.