मविआच्या जनआक्रोश मोर्चाला लाभली जनतेची प्रचंड साथ….!
स्थानिक जनहिताच्या मागण्या घेऊन तहसिलवर दिली धडक
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : समीर शिंदे । यवतमाळ
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वतीने बाभुळगांव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, घरकुल लाभार्थी, लहान-मोठे व्यापारी, आदिवासी बांधव तसेच सुशिक्षीत बेरोजगारांचा तहसिल कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता करण्यात आले. खरेदी विक्री संघ येथुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. बाभुळगांव शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, सौ.वर्षाताई निकम, अशोकराव घारफळकर,अरविंद वाढोणकर, कृष्णाभाऊ कडू, किरण कुमरे, डॉ. रमेश महानूर, राजेंद्र पांडे, अतुल राऊत, संजीवनी कासार यांनी केले.
बाभुळगांव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहिर करण्यात यावा. शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टर रू. ५०,०००/- मदत देण्यात यावी. बाभुळगांव तालुक्यातील मजूर वर्गाला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. शेतकरी बांधवांना सरसकट पिक विमा देण्यात यावा. बेबळा प्रकल्प स्थानीक मच्छीमारी करिता राखीव ठेवण्यात यावा. बेबळा प्रकल्प ग्रस्तांना सरकारी नौकरी मिळावी अन्यथा रोजगारासाठी २५ लाख अनुदान देण्यात यावे. कोपरा – २, पहुर – २, कोल्ही या गावांना स्वतंत्र ग्राम पंचायतीचा दर्जा देण्यात यावा. बेबळा प्रकल्प ग्रस्तांचे न्यायलयीन निकाल लागून अजून पर्यंत निधी प्राप्त झाला नाही ते त्वरीत देण्यात यावा. बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध द्यावे अन्यता रोजगार भत्ता त्वरीत सुरु करण्यात यावा. सोयाबीनला सात हजार रुपये तसेच कापसाला दहा हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा. अतिक्रमीत घरकुल लाभार्थ्यांना शासनाने राहत्या जागेचा मालकी हक्क पट्टा देऊन घरकुलाचा लाभ देण्यात यावा. ग्रामिण भागातील घरकुल लाभार्थ्यांना शहराप्रमाणे प्रती घरकुल रू. २,५०,०००/- येवढे अनुदान देण्यात यावे. ग्रामिण व शहरी असा भेदभाव करण्यात येऊ नये रखडलेले अनूदान त्वरीत देण्यात यावे. अल्पसंख्यांक घरकुल योजने अंतर्गत सर्व अल्पसंख्यांक समुदायाला घरकुल योजना त्वरीत मंजुर करण्यात यावी. बाभुळगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगली जनावारांचा अत्यंत त्रास होत आहे. उभ्या पिकाची नासाडी, पाळीव जनावारे मारणे, शेतकरी-शेतमजुर यांचेवर हल्ला करणे या सारखे प्रकार नेहमी घडत आहेत. तरी शासनाने यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. शेत – पांधन रस्ते त्वरीत सुरू करण्यात यावे, शहरासह तालुक्यामध्ये धडक सिंचन विहीर योजना त्वरीत सुरू करण्यात यावी. प्रलंबित कृषी पंपाची विज जोडणी त्वरीत सुरू करण्यात यावी. या प्रमुख मागण्या यावेळी शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
मोदी सरकारची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चात मोदी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली होती. मोर्चा दरम्यान अंत्ययात्रेवर मूरमुरे सुद्धा फेकण्यात आले. तर एका कार्यकर्त्याचे मुंडण देखील करण्यात आले. या निमित्ताने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. या मोर्च्यात बाभुळगांव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, घरकुल लाभार्थी, लहान-मोठे व्यापारी, आदिवासी बांधव तसेच सुशिक्षीत बेरोजगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी श्रीकांत कापसे, श्याम जगताप, प्रविण खेवले,गजेंद्र कडूकार, सतिष ठाकरे, मोहन बनकर, प्रशांत वानखेडे, गजानन पांडे, मुकेश देशमुख, गोपाल कडू, मोहन भोयर, अक्षय राऊत, सतीश कावळे, सागर धवणे , वंदना दोंडगे, प्राची भरूट,प्रीती खेवले,प्रदीप नांदुरकर,भरत भुराणे, शेख जाहिर, सचिन माटोडे, कृष्णा ठाकरे यांचे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.