बाभूळगाव शहरानजीक मोठ्या पुलावर दुचाकी -ट्रकचा भिषण अपघात
… दुचाकीस्वार जागीच ठार, तर दुसरा उपचारादरम्यान मृत
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :-
बाभूळगाव बस स्थानकाकडून शहरात येत असलेल्या दुचाकी व शहरातून बसस्थानकाकडे जात असलेल्या ट्रकचा मोठ्या पुलावर भिषण अपघात झाला. ही घटना दि. 01 आॅक्टोबर रोजी दुपारी 12.15 वाजताचे सुमारास घडली. यात दुचाकीस्वार हरेश्वर सुरेश गायकवाड, वय 26 वर्षे, रा. गवंडी हा जागीच ठार झाला असून पाठीमागे बसलेला पंकजकुमार, वय 35 वर्षे, रा. लबादा, उत्तरप्रदेश हा गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळ येथे रेफर केले, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनूसार बाभूळगाव शहरालगत मोठ्या पुलावर 11.30 वाजताचे दरम्यान एका आॅटोरिक्षाचा समोरील टायर फुटून तो अपघातग्रस्त झाला. व त्यामध्ये असलेले पाणी पुरी बनविण्याचे पाणी व साहित्य रस्त्यावर पडले. रस्त्यावर घट्टपाणी सांडल्यामुळे घरसण तयार झाली. त्यानंतर 12.15 वाजताचे सुमारास गवंडी येथील रहिवासी हरेश्वर सुरेश गायकवाड वय 26 वर्षे हा युवक बाभूळगाव येथे काही कामानिमित्त येत होता. बसस्थानकावरून सदर युवकाने पंकज कुमार, वय 35 वर्षे, रा. लबादा, उत्तरप्रदेश या एका कंपनीच्या काम करणा-या कर्मचा-यास लिफ्ट दिली. हरेश्वर गायकवाड याची दुचाकी क्र. एम.एच.29अे.जी.2973 मोठ्या पुलाजवळ आल्याबरोबर तेथे सांडून असलेल्या पाणीपुरीच्या पाण्यावरून घसरली. त्याच वेळी समोरून सिमेंट घेवून येत असलेल्या ट्रक क्र. एम.एच.34बी.झेड.6354 या वाहनाच्या मागील चाकात हरेश्वर गायकवाड फरफटल्या गेला. व त्याचे पाठीमागे बसलेला पंकजकुमार रस्त्यावर फेकल्या गेला. ट्रकच्या मागील चाकात आल्यामुळे हरेश्वरला जबर दुखापत होवून तो जागीच ठार झाला. त्याचवेळी ग्रामीण रूग्णालयाची रूग्णवाहिका बसस्थानकावरून बाभूळगाव शेहरात येत होती. ती थांबवून नागरिकांनी दोघाही अपघातग्रस्तांना बाभूळगाव ग्रामीण रूग्णालयात पाठविले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिका-यांनी हरेश्वर गायकवाड मृत झाल्याचे घोषीत केले तर गंभीर जखमी पंकजकुमार यांस यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. घटनास्थळावरून सिमेंटचा ट्रक पसार झाला होता. त्याला गवंडी फाट्याजवळ पोलीसांनी पाठलाग करून पकडून पोलीस स्टेशनला जमा केले. ट्रक चालक वकील अहमद कमर अली, वय 22 वर्षे, व क्लीनर यांना पोलीसांनी अटक केली आहे. सदर ट्रक हा बालाजी ट्रान्सपोर्ट चंद्रपूर येथील असून त्यामध्ये 30 टन सिमेंट हे जळगाव येथे नेले जात होते. घटनेचा पुढील तपास बाभूळगाव पोलीस करीत आहेत.