पणन मंत्र्यांने केलेल्या वक्तव्यांचा बाभूळगाव बाजार समितीने केला निषेध
— बाभूळगाव येथे सभापती, उपसभापतींनी दिली माहिती
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव। प्रतिनिधी:
कृषि उत्पन्न बाजार समित्यांची राज्य स्तरीय परिषद, पुणे येथील ग.दि. माडगुळकर नाट्यगृह, निगडी येथे दि. 3 आॅक्टोबर रोजी पार पडली. राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. मात्र आपल्याच विभागाच्या परिषदेमध्ये पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजार समिती संचालक, सभापतींना अपमानजनक शब्दांचा प्रयोग केल्याने वातावरण बिघडले. या परिषदेला बाभूळगाव बाजार समितीचे सभापती राजेंद्र पांडे, उपसभापती डाॅ. रमेश महानुर यांचेसह संचालक गेले होते. त्यांनी पणन मंत्र्यांचा रूद्रावतार पाहीला व या घटनेचा निषेध नोंदविला. या संबंधीची माहिती त्यांनी दि. 4 रोजी वृत्तपत्र प्रतिनिधींना दिली असून येत्या सोमवारी राज्यातील संपुर्ण बाजार समित्यांमध्ये बंद पुकारण्यात येत असल्याचे सांगितले.
राज्यातील सर्व बाजार समित्या, उपसमित्यांचे सभापती, उपसभापती, सचिव, संचालक यांचेशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र कृषि पणन मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या., पुणे यांचे संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद 3 आॅक्टोबर रोजी आयोजीत करण्यात आली होती. या परिषदेमध्ये राज्यातील 306 बाजार समित्या व 615 उपबाजार समित्यांचे शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकरी हिताचे निर्णय घेताना पणन महासंघाची परवानगी घ्यावी लागते. पणन महासंघाकडून कुठलीही मदत होत नाही, उलट 0.05 टक्क्यांचा सेस महासंघ बाजार समित्यांकडून वसुल करतो. अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे संचालकांना या परिषदेतून अपेक्षीत होती. असे यावेळी उपसभापती यांनी सांगितले. या परिषदेमध्ये पणन मंत्री दोन तास उशिरा पोहचले. व त्यानंतर त्यांनी कोणत्याही सभापती, उपसभापतीला आपली बाजू मांडू दिली नाही. परिषदेत इतका गोंधळ झाला की, पणनमंत्र्यांनी काही क्षणातच तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे संपुर्ण परिषदच बारगळली. त्यामुळे राज्यभरातून आलेल्या बाजार समिती प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. यावेळी बाजार समितीचे राज्य अध्यक्ष प्रविणकुमार नाहाटा यांनी नाराजी व्यक्त करीत येत्या सोमवारी राज्यातील सर्व बाजार समित्या, उपबाजार समित्या पणन मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी बंद राहणार असल्याचे व्यासपीठावरून जाहीर केले. अशी माहिती बाभूळगाव बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उपसभापती डाॅ. रमेश महानुर यांनी दिली. यावेळी सभापती राजेंद्र पांडे, संचालक दिनेश गुल्हाणे, अॅड. गजेंद्र कडूकार, अमोल कापसे, अतुल राऊत, प्रज्वल राऊत, डाॅ. बबन बोमले, प्रविण वाईकर उपस्थित होते.