शेतक-यांच्या खात्यांना बँकांनी लावलेले ‘होल्ड’ हटवावे- नितीन महल्ले,
— किसानहित संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :-
महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या पिकांचे झालेले नुकसान पाहता विविध माध्यमातून अनुदानाची व नुकसान भरपाईची घोषणा करून त्या प्रमाणे अनुदाने व नुकसान भरपाई संबंधीत नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केलेली आहे. परंतु असे लक्षात आले की, बँकांनी अनेक शेतक-यांची बँक खाती त्यांचेवर कर्ज असल्यामुळे ‘होल्ड’ करून ठेवलेली आहे. त्यामुळे शासनाने अनुदान किंवा नुकसान भरपाईची रक्कम संबंधीत शेतक-यांना खात्यातून काढता येत नाही. किंवा काही शेतक-यांचा जमा झालेला निधी परस्पर कर्ज खात्यांमध्ये वळता केलेला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या खात्यांना बँकांनी लावलेले ‘होल्ड’ हटवावे, अशी मागणी किसानहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन महल्ले यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे. या बाबतचे निवेदन तहसीलदार मीरा पागोरे यांना दि. 8 रोजी देण्यात आले.
विदर्भातील शेतकरी आधीच कर्जबाजारी झालेला असून सततची नापिकी, गारपीट, आदिंमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातही चालू हंगामामध्ये शेतीच्या कामांसाठी पैशाची कशीबशी तजविज तो करतो आहे. त्यात शासनाकडून मिळालेल्या अनुदान किंवा नुकसान भरपाईचा मोठा सहारा त्या शेतक-याला होत असताना आता बँकांकडून खात्यांवर ‘होल्ड’ लावल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आलेला आहे. इतकेच नाहीतर शेतक-यांच्या घरकुल योजनेची रक्कम, मुलींच्या शिष्यवृत्ती संबंधीची रक्कम, किवा इतरही शासकीय निधी जो संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या खात्यात जमा होतो, त्यालाही होल्ड लावला जातो.वडीलांच्या खात्यावर कर्ज थकित असल्यामुळे बँकांनी त्या खात्यांना लावलेल्या ‘होल्ड’मुळे रक्कम काढता येत नाही. अशी बिकट परिस्थीती सर्वत्र निर्माण झाली आहे. तसेच बँकांना रू.100/- स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यावरही इतर बँकांचे कर्ज नसल्याचे दाखले मागण्यात येतात. शेतक-यांचा सिबील तपासल्या जाते, पिक कर्जासाठी त्यांना चेक मागितले जातात. अश्या प्रकारे बँका त्रास देत असल्यामुळे शेतकरी सर्वच बाजूंनी हतबल झालेला आहे. तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतक-यांच्या बँक खात्यांवर लावलेले ‘होल्ड’ काढण्यात यावेत. या प्रकरणी स्वत: मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे अशी मागणी नितीन महल्ले यांनी निवेदनातून केली आहे.