घारफळकर विद्यालयाजवळ दिलेल्या थांब्यावर बसेस थांबविण्याची मागणी
— विद्यार्थ्यांचे तहसीलदार, शाखा व्यवस्थापकांना निवेदन
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव:-
येथील मातोश्री नानीबाई घारफळकर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बाभूळगाव रस्त्यावर बस थांबा विभाग नियंत्रक यवतमाळ यांनी दिला आहे. बस थांब्यासाठी विद्यालयाद्वारे सतत पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु नेर व राळेगाव आगाराच्या बाभूळगाव मार्गे जाणा-या बसेस या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दिलेल्या थांब्यावर बसेस थांबवा या मागणीचे निवेदन विद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी तहसीलदार मीरा पागोरे यांना दि. १० रोजी दिले.
घारफळकर विद्यालयात इयत्ता ५ वी ते १२ वीचे शेकडो विद्यार्थी षिक्षण घेत आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बाभूळगाव रस्त्यावर विनंती बस थांबा सन २००० पासून देण्यात आला होता. परंतु बरेच चालक, वाहक बस थांबवत नसल्याने विद्यालयाच्या वतीने पुन्हा बस थांब्यासाठी विभाग नियंत्रक यवतमाळ यांचेशी पत्र व्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार विभाग नियंत्रकांनी दि.२६/०४/२०२४ रोजी नेर व राळेगाव आगार प्रमुखांना पत्र देवून सदर ठिकाणी बसेस थांबविण्याबाबत कळविले होते. बस थांबण्यासाठी शाळेच्या माध्यमातून बोर्ड लावण्यात आला. तरी सुद्धा या ठिकाणी चालक, वाहक बसेस थांबवित नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाभूळगाव वस्ती स्टँड, किंवा बस स्थानकापासून पायदळ शाळेत यावे लागत असल्याने त्यांना शाळेत यायला उशीर होतो. शाळा सुटल्यावर सुद्धा तितकीच पायपिट या विद्यार्थ्यांना करावी लागत आहे. चालक, वाहकांना विद्यार्थ्यांनी याबाबत सांगितल्यास विद्यार्थ्यांशी ते हुज्जत घालतात, त्यामुळे विद्यार्थी धास्तावले आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय व ससेहोलपट थांबवावी, बस थांबविण्याच्या सुचना संबंधीत चालक, वाहकांना देण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. अन्यथा दि. ११ रोजी बाभूळगाव बसस्थानकावर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे.