एपीजे अब्दुल कलाम सारखं शेतकऱ्यांनी खंबीरपणे परिस्थितीशी लढावं .
……. शेतकरी सन्मान मेळाव्यात अशोक मेश्राम यांचे प्रतिपादन.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा। बाभुळगाव
नुकतेच मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजी ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीचे औचित्य साधून आर. एन .न्यूज चॅनलचे प्रमुख नईम मुल्ला यांनी बाभूळगाव येथील हर्षिता नगरीच्या प्रांगणात शेतकरी सन्मान सोहळा आयोजित करून शेतकऱ्यांचा सन्मान केला.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एडवोकेट इमरान देशमुख तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून अशोक मारुती मेश्राम मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे होते .
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना अशोक मारुती मेश्राम यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्याबाबत विचार व्यक्त केले. ते म्हणाले शासन स्तरावर शेतकऱ्यांच्या समस्यांची योग्य दखल न घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं मानसिक बल कमी झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं मानसिक संतुलन बिघडून त्याने नकारात्मक निर्णय घेऊ नये. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचा हवाला देत त्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाला सांभाळून शिक्षण घेतलं आणि खंबीरपणे शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा आलेख वाढवून ते देशाच्या प्रमुख पदावर पोहोचले. देशाची संरक्षण यंत्रणा असो की देशाचं सर्वोच्च राष्ट्रपती पद असो त्यांनी हे दोन्ही काम मोठ्या धीर गंभीरतेने सांभाळून देशाला जगामध्ये मानाचे स्थान मिळवून दिले. शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे. त्याच्यावर शेकडो वर्षांपासून अन्याय होत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं मानसिक संतुलन बिघडणे सहज बाब आहे परंतु शेतकऱ्यांनी आपलं संतुलन कायम ठेवून बदलत्या काळाला अनुरूप असा आकार आपल्या शेतीला दिला पाहिजे. शेतीमध्ये नव नवीन व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रयोग करून आपलं आर्थिक उत्पन्न वाढविले पाहिजे. याकरिता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच नियोजन होय. नियोजनाशिवाय केलेली कोणतीही कृती शेती असो की व्यवसाय असो हा यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे कोणताही व्यवसाय करीत असताना त्या व्यवसायाचं योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.म्हणून शेतकऱ्यांनी सर्वात आधी नियोजन काय आणि कसं करावं हे शिकणे फार गरजेचे आहे. शेतीमध्ये नवीन प्रयोग करत असताना व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करत त्याचं नियोजन करणे गरजेचे आहे. आपल्या कौटुंबिक गरजा आणि आपलं उत्पन्न यात तालमेळ असणे गरजेचे आहे. आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया अशा परिस्थितीत शेतकरी कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही. शेती करत असताना आपल्या शेतीच्या मातीचा पोत,हवामान ,पर्जन्यमान त्याचप्रमाणे बाजार बाजारातील मागणी इत्यादी गोष्टीचा अभ्यास करणे त्याचप्रमाणे शेतमालावर प्रक्रिया करता येईल का प्रक्रिया करून आपल्याला दाम दुप्पट भाव कसा मिळेल या दृष्टिकोनातून नियोजन करणे गरजेचे आहे काही बाबतीत एक एकटा शेतकरी नवनवीन प्रयोग करून प्रक्रिया उद्योग निर्माण करू शकतो काही प्रक्रिया उद्योग वैयक्तिक स्तरावर शक्य होत नसल्यास दहा शेतकऱ्यांचा एक गट तयार करून एक नाविन्यपूर्वक उद्योग व्यवसाय उभा करून शेतकरी संपन्न होऊ शकतो म्हणतात ना उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी जोपर्यंत माझा शेतकरी बांधव शेतीला व्यापार समजणार नाही उद्योग समजणार नाही तोपर्यंत शेतीही नफ्याची होऊ शकत नाही शेतीला नफ्यात आणायचं असेल तर खूप मोठा पोटेन्शिअल शेती उद्योगात आहे परंतु शेतकऱ्यांनी नवनव पद्धतीने विचार करण्याची नवनवीन संकल्पना साकार करण्याची नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करण्याची गरज आज निर्माण झाली आहे आज हवामान बदललेला आहे हवामान पूरक पीक पेरणी माझ्या शेतकरी बांधवांना करावी लागेल शेतीमध्ये बहुपीक पद्धतीचा वापर करावा लागेल पिकलेल्या मालावर प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करावे लागेल तरच शेती ही उत्पन्नाची हमी देणारी ठरेल या दृष्टीकोनातून माझ्या शेतकरी बांधवांनी ज्या ज्या ठिकाणी असे उपक्रम सुरू असेल त्या त्या ठिकाणी जाऊन भेट देणे काही प्रशिक्षण घेणे आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला शेतीवर आधारित उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षण देणे आज रोजी अत्यंत महत्त्वाचे आहे. शेती असा एक व्यवसाय आहे की ज्या व्यवसायातून एका बियाचे लाखो बियांमध्ये रूपांतर होऊ शकते. गरज आहे ती या बियांना लोकांची मागणी कशी वाढेल या दृष्टिकोनातून नियोजन करण्याची.
शेतकरी बांधवांनो तुमच्या डोक्यात असलेलं नकारात्मक विचार झटकून टाका व योग्य दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी तयार व्हा. तुम्हीच तुमचे उद्धारकर्ते व्हा. शासन नावाची यंत्रणा तुम्हाला आधार देणारी पूरक व्यवस्था आहे. त्याचा सुद्धा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी शासकीय अधिकारी असो पदाधिकारी असो शेती क्षेत्रातील तज्ञ मंडळी असो या सर्वांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभु शकतं. परंतु जोपर्यंत तुम्ही मानसिक दृष्ट्या तयार होणार नाही आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ही बाब तुम्हाला फायद्याची ठरणार नाही. त्यासाठी तुम्ही उठा जागे व्हा आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करण्यासाठी सज्ज व्हा. तुमचे श्रम हे योग्य दिशेने जर कामी लावले तर तुम्ही गड जिंकल्याशिवाय राहणार नाही,तुमची शेती नफ्यात आल्याशिवाय राहणार नाही असे मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आहे तुम्ही आवळे खाता या आवळ्यावर प्रक्रिया करून जर तुम्ही आवळ्याचा मुरब्बा बनवून त्याचं मार्केटिंग केलं तर तुम्हाला पाच पट नफा मिळाल्याशिवाय राहणार नाही याला मूल्यवर्धन असे म्हणतात. तुम्ही शेतामध्ये हरभरा पिकवता हरभरा तुम्ही विकून टाकता आणि हरभऱ्याची डाळ तुम्ही विकत घेता त्याच डाळीचं बेसन तुम्ही विकत घेता हरभरा पन्नास रुपये किलो विकला तुम्ही डाळ ८० रुपये किलो घेतली त्याच डाळीचं बेसन 120 रुपये किलो घेतलं हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. हरभऱ्याची डाळ बनवणं आणि डाळीचं बेसन बनवणे यात फार मोठं कसंब लागत नाही. तयारी पाहिजे ती तुमच्या डोक्यामध्ये प्रक्रिया करून उत्पादनाचं मूल्यवर्धन करण्याची. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी विपरीत परिस्थितीतून यशाचं शिखर गाठलं त्यांच्या जीवनापासून आपणही प्रेरणा घेऊन प्रतिकूल परिस्थितीतून यशाचं शिखर गाठावं हे जेव्हा तुम्ही साध्य कराल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांचे अनुयायी ठरू.असा मोलाचा सल्ला यावेळी माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी अशोक मेश्राम यांनी आपल्या भाषणातून दिला.