तळेगाव दशासर येथील बिल्डिंग मटेरियल पुरवठादाराची कार भस्मसात
चालक व मालक कारमोरे सकाळपासून बेपत्ता.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । तळेगाव.
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील सुप्रसिद्ध वाळू व्यावसायिक व बांधकाम साहित्य पुरवठादार आशिष संजय करमोरे यांची कार तळेगाव भाग-१ शेत शिवारातील बळीराम शिंदे यांच्या शेताजवळ आज दि. १७ रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पुर्णपणे भस्मसात अवस्थेत आढळली. या घटनेनंतर वाहन मालक आशिष करमोरे (वय ३०) हा बेपत्ता असल्याने विविध प्रकारची चर्चा गावात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव पोलिसांच्या ११२ सेवेवर सकाळी ८ वाजता फोन आला, की वाहन मालक आशिष कारमोरे (वय ३०) हे निमगव्हाण रस्त्यावरील अप्पर वर्धा कॅनॉलमधून बेपत्ता झाले होते. तळेगाव-निमगव्हाण मार्गावर असलेल्या बळीराम शिंदे यांचे शेताजवळ कार पूर्णपणे जळताना दिसली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार क्रमांक एम.एच.२७-डीई-०९९१ ही तळेगाव येथील रहिवासी आशिष कारमोरे यांची असल्याचे समोर आले असून ही घटना रात्री ३ वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते. या घटनेबाबत तळेगावचे एसएचओ रामेश्वर धौंडगे यांच्यासह जिल्हा गुन्हे शाखेचे पथकही तपासासाठी दाखल झाले आहे. रस्त्यापासून ५० फूट अंतरावर असलेल्या पांदण रस्त्यावर वाहनाला आग कशी लागली, ही आग कुठल्या ठिकाणी लागली, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. जेथे बैलगाडीही जात नाही मग ही गाडी ५० फुटांपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या अप्पर वर्धा कालव्याच्या कडेवर असलेल्या बळीराम शिंदे यांच्या शेताजवळ कशी आणि का आणली. मुख्य निमगाव रस्त्याच्या डाव्या बाजूला ही गाडी जळाली हे कोडेच बनले असून, या जळीत कारच्या घटनेचा तपास करणे तळेगाव पोलीस आणि ग्रामीण गुन्हे शाखेसाठी आव्हानात्मक बनले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाच्या तळाशी जाऊन सखोल तपास सुरू केला असून यातून काय समोर येणार याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.