HomeUncategorizedबाबूभाई-शाम-राजू करतील काय तालुक्यात हेराफेरी ?

बाबूभाई-शाम-राजू करतील काय तालुक्यात हेराफेरी ?

बाबूभाई-शाम-राजू करतील काय बाभूळगाव तालुक्यात हेराफेरी ?

राळेगाव मतदार संघात तिस-या जागेसाठी चूरस

विशेष प्रतिनिधी | दिव्यदृष्टी डिजीटल न्युज

राळेगाव मतदार संघात भाजपा-महायुतीचे उमेदवार प्रा.डाॅ. अशोक रामाजी उईके विरूध्द काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. वसंत चिंधुजी पुरके यांच्यात थेट अर्थात दुहेरी लढत होणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र तिस-या जागेसाठी लढतीत असलेल्या तीन उमेदवारांची प्रचाराची लगबग पाहून ‘हेराफेरी’ सिनेमातील बाबूभाई, शाम व राजू या पात्रांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आता हे बघने उत्सुक्याचे राहणार आहे, की हे उमेदवार लढतीतल्या उमेदवारांच्या मतांमध्ये बाभूळगाव तालुक्यात किती प्रमाणात घट करू शकतात. त्या वरूनच विजयी उमेदवाराच्या आघाडीतील मतांचा फरक लक्षात येईल.

जसा जसा प्रचाराने वेग धरला आहे, तसतशी निवडणूकीत रंगत वाढत आहे . दिवसागणिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा गावागावात पोहचून रॅली काढून, मतदारांशी संवाद साधत आहेत. यावेळी आपण कुठच मागे पडता कामा नये यासाठी महायुती व महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक मेहनत घेताना दिसून येत आहे. त्यात आता तिस-या नंबरसाठी तीन दमदार उमेदवारांची ‘एन्ट्री’  बाभूळगाव तालुक्यात झालेली आहे. यातील प्रत्येक उमेदवार एकापेक्षा एक असा सरस असल्याचे भासवत आहे. मनसेचे दबंग उमेदवार अशोक मेश्राम यांनी गेल्या दोन महिन्यांपासून बाभूळगाव तालुका पिंजून काढला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे किरण कुमरे यांनी तालुक्यात कार्यकर्त्यांची मोट बांधली असून त्यांचे कार्यकर्ते काँग्रेसमधील काही नाराजांना सोबत घेवून घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाकडून उभे असलेले युवा चेहरा डाॅ. अरविंद कुळमेथे तालुक्यात आकर्षणाचा विषय ठरू पाहत आहे. एकंदरीत या तीनही उमेदवारांना तालुक्यात मतांचा जोगवा मिळण्यात कितपत यश मिळते हे पाहणे उत्सुक्याचे ठरणार आहे.

‘हेराफेरी’ या चित्रपटात दाखविल्या प्रमाणे बाबूभाई हा पैसेवाला असल्याने तो पैशाच्या जोरावर अधीक कमाई करण्याच्या उद्देशाने शहरात येतो. तर श्याम आपले आकर्षक व्यक्तीमत्वाच्या आधारावर शहरात नोकरी शोधण्याठी येतो, तर युवा असलेला राजू आपल्या मिष्कील व चालाख स्वभावाच्या माध्यमातून शहरात स्थिरावण्यासाठी येतो. एकंदरीत तिघांचाही उद्देश एका शहरात येवून आपले विशिष्ट स्थान निर्माण करणे हाच असतो. त्यासाठी हे तीघेही आपापल्या परीने ‘हेराफेरी’ करताना दिसून येतात. तसाच काहीसा प्रकार या निवडणूकीत बाभूळगाव तालुक्यात अनुभवता येणार आहे. परंतु तालुक्यातील मतदार यांच्या पारड्यात मतांचा जोगवा देतात किंवा नाही? हे निकालाअंती कळणार आहे. तालुक्यात सद्यस्थितीत महायुती व महाविकास आघाडीच्या दोन दिग्गज गुरुंचाच बोलबाला आहे. त्यामुळे तालुक्यातून चार अंकी मतांचा आकडा बाबूभाई, शाम व राजू पार करतील काय? तालुक्यातील मतांची हेराफेरी करण्यात ते यशस्वी होतील काय? सिनेमाचा क्लायमॅक्स कसा राहील? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img