नांदुरा (बुद्रुक) येथे दत्त जयंती निमित्त कार्यक्रम
दत्तनामाचा केला जातो जागर
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :-
तालुक्यातील नांदुरा ( बुद्रुक ) येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव साजरा केला जात आहे. सन 1926 मध्ये वामन द्वादशीचे दिवशी तपस्वी संत श्री गुरु परमहंस दत्त अवधूत ब्रह्मानंद स्वामी यांनी अवधूत गड, नांदुरा(प्रतापपुर) येथे संजीवन समाधि घेतली. हे नयन रम्य ठिकाण यवतमाळ धामणगाव रस्त्यावरील ब्रिटिश कालीन प्रसिद्ध नांदुरा बुद्रुक येथील पुलाचे पलीकडे बेंबळा नदीच्या काठावर एका उंच टेकडीवर आहे. स्वामी महाराजांनी त्या ठिकाणी अंदाजे तीन-चार वर्ष वास्तव्य केले. दरवर्षी येथे दत्तनामाचा जागर करण्यात येतो.
कोपरा जानकर येथील प्रसिद्ध जानकर घराण्यातील श्रीमंत गोविंदराव बाजीराव जानकर यांची महाराजांची भेट काशी विश्वेश्वर येथे झाली आणि त्यांनी महाराजांना आपले गावात येण्याचे निमंत्रण दिले. त्यांच्या निमंत्रणा वरून भ्रमण करीत नांदुरा येथे आले व प्रतापपूर नांदुरा येथे टेकडीवर राहू लागले. सन 1929 पासून या ठिकाणी दत्त जयंतीची यात्रा भरते. दिनांक 14 डिसेंबर ला दत्त जन्म व 15 डिसेंबर मार्गशीर्ष पौर्णिमा काला, प्रसाद दहीहंडी व पालखी भ्रमण आणि यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती व्यवस्थापक प्रकाश जानकर पाटील यांनी केली आहे.