HomeUncategorized‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

Divya Drushti Digital News

सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना आज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एनसीपीए येथील टाटा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षक आमदार किरण सरनाईक, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी संभाजी थोरात आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांच्या कार्यकाळातील निर्णयांचे संकलन असलेल्या कार्यअहवालाचे तसेच ‘बालभारती’च्या वतीने तयार करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज स्मृती ग्रंथाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, यामुळेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात राज्याला अग्रेसर राखण्यासाठी नवनवीन कल्पनांना शासनाने नेहमीच पाठबळ दिले आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्याची जोडही आवश्यक असल्याने नवीन शिक्षण पद्धती अवलंबण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आयुष्यात मोठी उंची गाठणे शक्य होईल आणि या कामी योग्य वेळी योग्य दिशा दाखवण्याचे काम शिक्षक करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. शिक्षण क्षेत्रातही आघाडी घेण्यासाठी शासनामार्फत विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या माध्यमातून तीन जागतिक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. आदर्श शाळा विद्यार्थ्यांना जगण्याचा मंत्र शिकवित असल्याने आदर्श शाळा घडविण्यामध्ये शिक्षकांची भूमिका मोलाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकाकडे झेप घेण्यामध्ये शासकीय शाळांचा मोठा वाटा असल्याचे सांगून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आस्थेवाईकपणे सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले. आपल्या किसननगर येथील शाळेच्या आठवणी जागवून आपल्या प्रगतीमध्ये शिक्षक रघुनाथ परब यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इमारतींपेक्षा शिक्षकांवरून शाळेचे महत्त्व ठरते असे सांगून खडू आणि छडीच्या जोरावर आयुष्याची शिडी चढण्यास शिकविणाऱ्या शिक्षकांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले.

ॲड.नार्वेकर म्हणाले, ‘वाचाल तर वाचाल’ असे नेहमी म्हटले जाते. परंतु जो वाचायला शिकवतो तो समाज घडवतो, यामुळे चांगला समाज घडविण्यामध्ये शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. शासनाने शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिले असून देशाला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी अग्रेसर होण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

गुणवंत महाराष्ट्र घडविणार – दीपक केसरकर

महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा वाढून गुणवंत महाराष्ट्र घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे असणार आहे. यासाठी शासनामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येत असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षकांसाठी टप्पा अनुदान लागू करून त्यांना प्रवाहात आणण्यात आले आहे. डिसेंबर ऐवजी जून महिन्यापासून हा टप्पा लागू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येईल. शिक्षक भरतीला सुरूवात करून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. ग्रंथपाल, शिक्षण सेवक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून त्यांना यापुढे निवडणूक आणि जनगणनेव्यतिरिक्त अशैक्षणिक कामे देण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, शासनाने सर्व विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेण्यात आला. पोषण आहारात अंडी, केळी, मिलेटस् देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा तसेच शेतीची माहिती व्हावी यासाठी परसबाग योजना राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा बोजा कमी करण्यात आला आहे. व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात येत असून जर्मनीमध्ये रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावाचन उत्सव अभियानाअंतर्गत एक लाख शाळा आणि एक कोटी विद्यार्थी सहभागी होतील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बदलापूर येथील दुर्देवी घटनेनंतर तातडीने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना प्रवर्गनिहाय प्राथमिक- ३८, माध्यमिक- ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)- १९, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार- ८, विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१)- २, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक- १, स्काऊट/गाईड (१+१)-२ अशा एकूण १०९ शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img