बँक व्यवस्थापकावर कार्यवाहीची मागणी
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा :
दिव्यांगांच्या विविध मागण्यांकरिता तालुक्यातील समस्याग्रस्त दिव्यांग बांधवांनी दि. १२ सप्टेंबर रोजी तहसिलदार बाभूळगांव यांचे कक्षात यवतमाळ जिल्हा दिव्यांग संघर्ष समितीच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनांचे अनुदान दिनांक ३ जुलै, २०२४ या दिवशी स्टेट बँक शाखा बाभूळगांव यांच्याकडे तहसिल कार्यालय, संजय गांधी विभाग, बाभूळगांव यांच्याकडुन निधी प्राप्त झाला. असे असतांना बँकेने ३ ऑगष्ट ते १४ ऑगष्ट पावेतो लाभार्थ्यांना वाटपाची प्रक्रिया बँकेकडुन करण्यात आली. तेव्हा १ महिना लाभार्थ्यांना सदर योजनेचे अनुदान उपलब्ध असतांना देखील वाट बघावी लागली, त्यामुळे भारतीय स्टेट बँक शाखा बाभूळगांव व्यवस्थापक हे कायदेशीर दोषी असुन त्यांचेवर कार्यवाही करावी, भारतीय स्टेट बँक शाखा बाभूळगांवचे व्यवस्थापकावर तात्काळ कार्यवाही करून पाठविलेल्या अनुदान रक्कमेवर १ महिन्याचे व्याज घेण्यात यावे. यासह ग्रामपंचायतींनी दिव्यांगांचा ५ टक्के निधी दिलेला नाही, त्यामुळे तहसीलदार यांनी गट विकास अधिकारी यांना बोलावून या विषयाचा जाब विचारण्यात यावा. दिव्यांगांचे ५ टक्के आरक्षणानुसार २०१५ पासुन ते २०२४ पावेतो घरकुल योजनेचे किती लाभार्थी आहेत याची यादी तहसील कार्यालयामार्फत उपलब्ध करून दिव्यांग संघटनेला माहिती देण्यात यावी. या मुद्यांना धरून दिव्यांग संघटनेने तहसिलदार यांचे कक्षात ठिय्या आंदोलन केले. यावेळी दिव्यांग संघर्ष समिती अध्यक्ष प्रकाश कांबळे, प्रकाश जाधव यांचेसह दिव्यांग बंधू, भगिनी उपस्थित होते.
दिव्यांग संघर्ष समितीने काढला स्टेट बँकेपासून मोर्चा
स्टेट बँकेच्या वर्तणुकीमुळे व्यथित झालेल्या दिव्यांग बांधवांनी स्टेट बँकेच्या शाखा कार्यालयापासून मोर्चा काढला. प्रचंड घोषणाबाजी करत सदर मोर्चा तहसीलवर धडकला. यावेळी समिती अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी प्रशासकीय यंत्रणा कश्याप्रकारे दिव्यांगांना त्रास देत आहेत या विषयावर विचार व्यक्त केले. २० ऑगस्ट रोजी तहसीलदार यांना निवेदन देवून स्टेट बँक व्यवस्थापनाची चौकशी करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. व त्यात आठ दिवसाची मुदत दिव्यांग संघर्ष समितीने दिली होती. मात्र तहसील प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने सदरचे ठिय्या आंदोलन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.